भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेला 3 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. तीन ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेनंतर भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन कसोटी सामने होणार आहेत. पहिला कसोटी सामना इंदूर येथे, तर दुसरा सामना कोलकाताच्या ऐतिहासिक इडन गार्डनवर खेळवला जाणार आहे. या कसोटीबाबत टीम इंडियानं मोठा निर्णय घेतला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदावर विराजमान होताच माजी कर्णधार सौरव गांगुलीनं टीम इंडियानं डे-नाईट कसोटी खेळावी असा प्रस्ताव ठेवला होता. त्यादृष्टीनं पाऊलं उचलली गेली आहेत. बीसीसीआयनं कोलकाता येथे होणारी कसोटी डे नाईट खेळवावी असा प्रस्ताव बांगलादेश क्रिकेट मंडळाकडे पाठवला आहे. बांगलादेश क्रिकेट मंडळाचे चेअरमन अक्रम खान यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पण, याबाबत अद्याप विचार केला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले,''बीसीसीआयनं आमच्याकडे डे नाईट कसोटीचा प्रस्ताव ठेवला आहे. संपूर्ण विचार केल्यानंतर आम्ही आमचा निर्णय त्यांना कळवणार आहोत. मागील तीन दिवसांत आम्हाला दोन पत्र पाठवण्यात आले आहेत. आम्ही त्याचा विचार करत आहोत, परंतु अजून त्यावर चर्चा झालेली नाही. येत्या एक-दोन दिवसांत आम्ही आमचा निर्णय कळवू.''
बांगलादेश क्रिकेट मंडळाचे प्रमुख निझामुद्दीन चौधरी यांनी आम्ही डे-नाईट कसोटी खेळू, याची शास्वती नाही. हा निर्णय खेळाडू व संघ व्यवस्थापनावर अवलंबून आहे. ते म्हणाले,''याबाबत आम्हाला खेळाडू व संघ व्यवस्थापनाचं मत जाणून घ्यायला हवं. हा संपूर्णपणे तांत्रिक मुद्दा आहे आणि गुलाबी रंगाच्या चेंडूवर खेळण्यासाठी सराव गरजेचा आहे.''
भारताचा कसोटी संघ - विराट कोहली, रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, वृद्धीमान साहा ( यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, शुबमन गिल, रिषभ पंत.
14 ते 18 नोव्हेंबर - पहिली कसोटी, इंदूर
22 ते 26 नोव्हेंबर - दुसरी कसोटी, कोलकाता.
Web Title: India vs Bangladesh: India propose Day-Night Test at Eden Gardens against Bangladesh - Report
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.