India vs Bangladesh Live Marathi : गचाळ क्षेत्ररक्षण आणि सोडलेले झेल, यामुळे पाकिस्तानला सुपर ४ मधील लढतीत काल श्रीलंकेकडून हातचा सामना गमवावा लागला. आज भारतीय खेळाडूंकडूनही अशाच चूका झाल्या. शाकिब अल हसन व तोवहिद हृदोय यांनी त्याचा पुरेपूर फायदा घेताना १०१ धावांची भागीदारी केली आणि त्यामुळे ४ बाद ५९ धावांवर बांगलादेशने मोठी मजल मारली. भारतासमोर तगडे लक्ष्य ठेवण्यात ते यशस्वी झाले. शार्दूल ठाकूरने ३, तर मोहम्मद शमीने २ विकेट्स घेतल्या.
बांगलादेशविरुद्धच्या आजच्या औपचारिक सामन्यात टीम इंडिया ५ बदलांसह मैदानावर उतरली. तिलक वर्माला पदार्पणाची संधी दिली गेली, तर सूर्यकुमार यादव, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा हे प्लेइंग इलेव्हनमध्ये परतले आहेत. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला अन् मोहम्मद शमीने तिसऱ्या षटकात लिटन दासचा ( ०) त्रिफळा उडवला. त्यानंतर शार्दूल ठाकूरने तांझीद हसन ( १३) व अनामुल हक ( ४) यांना माघारी पाठवून बांगलादेशची अवस्था ५.४ षटकांत ३ बाद २८ अशी केली. शार्दूलच्या पुढच्या षटकात पदार्पणवीर तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी बांगलादेशच्या मेहिदी हसनचे दोन झेल टाकले. अक्षर पटेलने बांगलादेशला चौथा धक्का दिला. रोहितने स्लीपमध्ये मेहिदी हसन मिराजचा ( १३) सुरेख झेल टिपला.