India vs Bangladesh Live Match Updates । न्यूयॉर्क : बांगलादेशविरूद्धच्या सराव सामन्यात भारतीय फलंदाजांनी सराव म्हणून एक वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. कर्णधार रोहित शर्मा आणि संजू सॅमसनने डावाची सुरुवात केली. विराट कोहली नुकताच अमेरिकेत दाखल झाल्याने त्याला विश्रांती देण्यात आली. रिषभ पंतने अर्धशतकी खेळी करून विश्वचषकासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले. इतरही फलंदाजांचा सराव व्हावा या हेतूने पंतला निम्म्यातून तंबूत परतावे लागले. तो ३२ चेंडूत ५३ धावा करून नाबाद परतला. त्यानंतर हार्दिक पांड्याने स्फोटक खेळी केली. त्याने २३ चेंडूत ४० धावा कुटल्या.
भारताने निर्धारित २० षटकांत ५ बाद १८२ धावा केल्या. भारताकडून रोहित शर्मा (२३), संजू सॅमसन (१), रिषभ पंत (नाबाद ५३), सूर्यकुमार यादव (३१), शिवम दुबे (१४), हार्दिक पांड्या (नाबाद ४०) आणि रवींद्र जडेजा नाबाद (४) धावा करून माघारी परतला. बांगलादेशला सराव सामना जिंकण्यासाठी १८३ धावांची आवश्यकता आहे. हार्दिकने ४ षटकार आणि २ चौकार लगावले. त्याने डावाच्या सतराव्या षटकात षटकारांची हॅटट्रिक मारली. आयपीएलमध्ये फॉर्मसाठी संघर्ष करत असलेल्या पांड्याची ही खेळी म्हणजे भारतीय चाहत्यांसाठी सुखद धक्काच म्हणावा लागेल.
तत्पुर्वी, भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम गोलंदाजीसाठी आमंत्रित केले. नाणेफेकीवेळी रोहित शर्मा म्हणाला की, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यामागे कोणतेही विशेष कारण नाही. प्रथमच न्यूयॉर्क येथे खेळत आहोत. त्यामुळे कोणताही विचार न करता प्रथम फलंदाजी करणे पसंत केले. येथील परिस्थिती आव्हानात्मक असून, आम्ही स्वत:ला हे आव्हान दिले आहे. विराट कालच इथे पोहोचला आहे. त्यामुळे त्याला विश्रांती देण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला.
सराव सामन्यासाठी दोन्हीही संघ -भारत - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, संजू सॅमसन, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.
बांगलादेश - नजमूल हुसैन शांतो (कर्णधार), तन्जीद हसन, Tawhid Hridoy, लिटन दास, शाकीब अल हसन, महमुदुल्लाह रियाद, जेकर अली, सौम्य सरकार, महेदी हसन, तन्वीर इस्लाम, शोरिफुल इस्लाम, रिशाद हुसैन, तन्जीद हसन साकीब.