कोलंबो : काल झालेल्या अंतिम सामन्यात सामनावीर ठरलेल्या दिनेश कार्तिकने केवळ 8 चेंडू खेळताना संपूर्ण सामना फिरवला. त्याने दोन चौकार व तीन षटकारांची आतषबाजी करत बांगलादेशच्या हातातून सामना अक्षरश: खेचला. कार्तिकने अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकून भारताला थरारक विजय मिळवून दिल्यानंतर बांगलादेशच्या खेळाडूंना आपली निराशा लपवता आली नाही. काल झालेल्या अंतिम सामन्यात कार्तिकच्या तुफानी खेळीच्या बळावर भारताने कोलंबोतल्या तिरंगी मालिकेत भारताने विजेतेपदाचा करंडक उचलला. या सामन्यात भारताला विजयासाठी अखेरच्या चेंडूवर पाच धावांची आवश्यकता असताना कार्तिकने सौम्या सरकारला षटकार ठोकला आणि टीम इंडियाने विजयासाठीचं लक्ष्य पार केलं.
ते निर्णायक षटक -
- अखेरच्या षटकात भारताला 12 धावांची गरज होती. 20 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर नवखा खेळाडू विजय शंकर स्ट्राईकवर होता. दबाव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होता. सौम्या सरकारने पहिलाच चेंडू वाईड टाकला. त्यामुळे एक धाव भारताच्या खात्यात जमा झाली.
- सौम्या सरकारने पहिला चेंडू निर्धाव टाकला. त्यामुळे नवखा खेळाडू विजय शंकरवरील दबाव आणखी वाढला.
- दुसऱ्या चेंडूवर विजय शंकरने एक धाव घेतली आणि दिनेश कार्तिक स्ट्राईकवर आला. दुसरी धाव घेण्यासाठी विजय शंकरने नकार दिला. त्यामुळे दिनेश कार्तिक स्ट्राईकवर राहिला.
- तिसऱ्या चेंडूवर दिनेश कार्तिकने एक धाव घेतली आणि पुन्हा एकदा विजय शंकर स्ट्राईकवर आला.
- अखेरच्या षटकातील चौथ्या चेंडूवर विजय शंकरने शानदार चौकार ठोकला आणि भारताच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या.
- पाचव्या चेंडूवर विजय शंकर मोठा फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला.
- सुदैवाने अखेरच्या चेंडूसाठी स्ट्राईकवर दिनेश कार्तिकच होता आणि विजयासाठी एका चेंडूत 5 धावांची आवश्यकता होता. सर्वांनी श्वास रोखून धरले होते. मात्र दिनेश कार्तिकने अखेरच्या चेंडूवर षटकार ठोकला आणि मालिका भारताच्या खिशात टाकली.