हिटमॅन रोहित शर्मा हा आपल्या मैदानातील तुफान फटकेबाजीशिवाय त्याच्या खास स्वभावामुळंही चर्चेत असतो. समोरच्याला एखादी गोष्ट सांगताना अर्धवट बोलण्याची त्याची हटके शैली असो किंवा वस्तू विसरण्याची त्याची खोडी यासंदर्भातील त्याचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. पण आता मॅचआधी एखाद्या गोष्टीसंदर्भात तो किती गंभीर असतो, त्याचा किस्सा एकदम अफलातून किस्सा चर्चेत आला आहे. रोहितच्या एका खास सहकाऱ्यानेच यासंदर्भातील गोष्ट शेअर केलीये.
अनुभवी फिरकीपटूनं शेअर केला रोहितसंदर्भातील खास किस्सा
टीम इंडियासह मुंबई इंडियन्सकडून खेळताना रोहितसोबत ड्रेसिंग रुम शेअर करणाऱ्या पीयूष चावलाने नुकतीच शुभांकर मिश्राच्या युट्यूब चॅनेलवर एक खास मुलाखत दिली. यावेळी अनुभवी फिरकीपटूनं रोहित शर्मासंदर्भातील एक खास किस्सा सांगितला. पीयूष चावला म्हणाला की,
मॅचनंतर अनेकदा रोहित आणि मी एकत्र बसून खेळाविषयी चर्चा करायचो. एकदा तर रात्री अडीच वाजता त्याने मला मेसेज करून तू जागा आहेस का? असा प्रश्न विचारला होता. ज्यावेळी मी त्याच्याकडे पोहचलो त्यावेळी त्याच्याकडे डेविड वॉर्नरला जाळ्यात अडकवण्यासाठी क्षेत्ररक्षण कसे लावायचे याचा प्लान पेपवर तयार होता. त्याने यासंदर्भातील आयडिया माझ्याशी शेअर केली. माझ्याकडून सर्वोत्तम कामगिरी कशी करुन घेता येईल, याचा तो विचार करत होता.
रोहित शर्मासंदर्भातील आतापर्यंत न ऐकलेला हा किस्सा मैदानाबाहेर असतानाही तो मॅचबद्दल किती जागरुक असतो, तेच दाखवून देणारा आहे.
उत्तम नेतृत्व कौशल्य असणारा खेळाडू
कर्णधार आणि नेतृत्व यात फरक आहे. रोहित हा संघाचे उत्तमरित्या नेतृत्व करणारा चेहरा आहे, असेही पीयूष चावलानं म्हटले आहे. २०२३ चा वर्ल्ड कप असो किंवा २०२४ ची टी २० वर्ल्ड कप स्पर्धा दोन्ही वेळी रोहितनं बॅटिंगमध्ये एक वेगळा टोन सेट करत अन्य फलंदाजांना रान मोकळं करून दिलं. ही त्याच्या नेतृत्वातील खासियत आहे, असेही पीयूष चावला म्हणाला आहे.