भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातल्या कसोटी मालिकेला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. ट्वेंटी-20 मालिकेत विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया कसोटीतील आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी सज्ज आहे. पण, बांगलादेश संघानंही कंबर कसली आहे. पहिल्या ट्वेंटी-20 प्रमाणे टीम इंडियाविरुद्ध कसोटीत पहिल्यांदा विजय मिळवण्यासाठी ते उत्सुक आहे. कर्णधार विराट कोहलीच्या पुनरागमनानं टीम इंडियाची फलंदाजांची फळी अधिक मजबूत झाली आहे. पण, गोलंदाजीत सर्वांचे लक्ष असणार आहे, ते फिरकीपटू आर अश्विन याच्याकडे. या सामन्यात अश्विनला दिग्गज फिरकीपटू अनील कुंबळे यांच्या पंक्तित बसण्याची संधी आहे.
या सामन्यात अश्विनला संधी मिळाल्यास, त्याला एक विक्रम करण्याची संधी आहे. घरच्या मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये 250 विकेट्स पूर्ण करण्यासाठी अश्विनला केवळ एक फलंदाज बाद करावा लागणार आहे. तसे करण्यात तो यशस्वी झाल्यास घरच्या मैदानावर 250 कसोटी विकेट घेणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरेल. यापूर्वी अनील कुंबळे आणि हरभजन सिंग यांनी हा विक्रम केला आहे. घरच्या मैदानावर अनील कुंबळेच्या नावावर 350, तर हरभजन सिंगच्या नावावर 265 विकेट्स आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांत अश्विन चौथ्या स्थानावर आहे. कुंबळे 619 विकेट्ससह अव्वल स्थानावर आहे. त्यापाठोपाठ कपिल देव 434 आणि हरभजन 417 विकेट्ससह अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी आहेत. अश्विनच्या नावावर 357 विकेट्स आहेत.
कसोटी मालिकेसाठीचे दोन्ही संघभारत - विराट कोहली, रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, वृद्धीमान सहा, रवींद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, शुबमन गिल, रिषभ पंत
बांगलादेश - मोमिनूल हक ( कर्णधार) शदमन इस्लाम, इम्रुल कायस, सैफ हसन, लिटन दास, मुश्फिकर रहीम, महमुद उल्लाह, मोहम्मद मिथून, मुसाडेक होसैन सैकट, मेहिदी सहन मिराझ, तैजूल इस्लाम, नयीम हसन, मुस्ताफीजूर रहमान, अल-अमीन होसैन, अबू जायेद चौधरी, इबादत होसैन.