दक्षिण आफ्रिकेत नुकत्याच पार पडलेल्या 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला हार पत्करावी लागली. बांगलादेशनं हा सामना जिंकून प्रथमच वर्ल्ड कप उंचावला. पण, विजयाच्या उन्मादात बांगलादेशच्या खेळाडूंनी घातलेला धिंगाणा, हा चर्चेचा विषय बनला. त्यात भारतीय खेळाडूंचाही सहभाग असल्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) बांगलादेशच्या तीन आणि भारताच्या दोन खेळाडूंना दोषी ठरवले. आता भारतीय क्रिकेट नियमाक ( बीसीसीआय) मंडळही भारतीय खेळाडूंवर कारवाई करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारताचे माजी कर्णधार कपिल देव आणि मोहम्मद अझरुद्दीन यांनी खेळाडूंवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजीला आलेल्या यशस्वी जैस्वाल आणि तिलक वर्मा यांनी दुसऱ्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी केली. पण, तिलक ( 38) 29व्या षटकात माघारी परतला. त्यानंतर भारताचा डाव गडगडला. कर्णधार ध्रुव जुरेल ( 22) वगळता टीम इंडियाच्या तळाच्या फलंदाजांना दुहेरी धाव करता आली नाही. यशस्वीनं फॉर्म कायम राखताना 121 चेंडूंत 8 चौकार व 1 षटकाराच्या मदतीनं 88 धावा केल्या. पण, तो बाद झाला आणि टीम इंडियाचा डाव 4 बाद 156 वरून सर्वबाद 177 असा गडगडला.
लक्ष्याचा पाठलाग करताना परवेझ होसैन इमोन आणि तनझीद हसन यांनी अर्धशतकी सलामी दिली. पण, रवी बिश्नोईनं सामना टीम इंडियाच्या बाजूनं झुकवला. त्यानं 10 षटकांत 3 निर्धाव षटक टाकून 30 धावांत 4 विकेट्स घेतल्या. सामना विचित्र अवस्थेत असताना बांगलादेशचा कर्णधार अकबर अलीनं नाबाद 47 धावांची खेळी करताना भारताचा पराभव निश्चित केला. पावसाच्या व्यत्ययामुळे बांगलादेशसमोर 46 षटकांत 170 धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले होते. त्यांनी हे लक्ष्य पार केले. त्यानंतर विजयाचा जल्लोष करताना मैदानावर धावलेल्या खेळाडूंमध्ये बाचाबाची झाल्याचे सर्वांनी पाहिले.
भारताला 1983मध्ये वर्ल्ड कप जिंकून देणारे कर्णधार कपिल देव यांनीही अझरुद्दीनच्या मागणीला पाठींबा दिला. ते म्हणाले,''या खेळाडूंना शिस्त लावण्यासाठी बीसीसीआयनं कठोर पाऊलं उचलायला हवीत. प्रतिस्पर्धी खेळाडूंना शिविगाळ करणं हे क्रिकेट नव्हे. आक्रमकतेचं मी स्वागत करतो, परंतु ती चुकीची नसावी.''