बांगलादेश संघानं आयसीसी 19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचं जेतेपद पटकावून इतिहास रचला. पण, विजयाच्या उन्मादात त्यांनी भारतीय संघातील खेळाडूंसोबत घातलेल्या राड्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं गंभीर दखल घेतली आहे. बांगलादेश संघानं तीन विकेट्स आणि 23 चेंडू राखून डकवर्थ लुईस नियमानुसार भारतीय संघावर विजय मिळवला. बांगलादेशचे हे पहिलेच वर्ल्ड कप जेतेपद आहे. त्यामुळे त्यांना अतीआनंद होणे साहजिक होते, परंतु त्या आनंदात त्यांनी केलेले वर्तन हे चुकीचे असल्याचे आयसीसीनं नमूद केलं. या प्रकरणी आयसीसीनं पाच खेळाडूंना दोषी ठरवले असून त्यात दोन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.
INDvBAN: बांगलादेशी खेळाडूंचं किळसवाणं सेलिब्रेशन; टीम इंडियाचा कर्णधार भडकला
प्रथम फलंदाजीला आलेल्या यशस्वी जैस्वाल आणि तिलक वर्मा यांनी दुसऱ्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी केली. पण, तिलक ( 38) 29व्या षटकात माघारी परतला. त्यानंतर भारताचा डाव गडगडला. कर्णधार ध्रुव जुरेल ( 22) वगळता टीम इंडियाच्या तळाच्या फलंदाजांना दुहेरी धाव करता आली नाही. यशस्वीनं फॉर्म कायम राखताना 121 चेंडूंत 8 चौकार व 1 षटकाराच्या मदतीनं 88 धावा केल्या. पण, तो बाद झाला आणि टीम इंडियाचा डाव 4 बाद 156 वरून सर्वबाद 177 असा गडगडला.
लक्ष्याचा पाठलाग करताना परवेझ होसैन इमोन आणि तनझीद हसन यांनी अर्धशतकी सलामी दिली. पण, रवी बिश्नोईनं सामना टीम इंडियाच्या बाजूनं झुकवला. त्यानं 10 षटकांत 3 निर्धाव षटक टाकून 30 धावांत 4 विकेट्स घेतल्या. सामना विचित्र अवस्थेत असताना बांगलादेशचा कर्णधार अकबर अलीनं नाबाद 47 धावांची खेळी करताना भारताचा पराभव निश्चित केला. पावसाच्या व्यत्ययामुळे बांगलादेशसमोर 46 षटकांत 170 धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले होते. त्यांनी हे लक्ष्य पार केले.
आयसीसीनं दोषी ठरवलेल्या खेळाडूंमध्ये मोहम्मद तोवहीद हृदय, शमीम होसैन आणि रकिबुल हसन या बांगलादेशी खेळाडूंसह आकाश सिंग व रवी बिश्नोई या दोन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. या पाचही जणांवर कलम 2.21च्या उल्लंघन केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. पण, बिश्नोईवर आणखी एक कलम 2.5 भंग केल्याचा आरोप आहे. पाचही खेळाडूंनी त्यांची चूक मान्य केली आहे.
बांगलादेशच्या हृदयला दहा निलंबन गुण मिळाले आहेत आणि दोन वर्षांसाठी हे गुण त्याच्या नावावर कायम राहणार आहेत. शमीमला 8, तर रकिबुलला 4 निलंबन गुण देण्यात आले आहेत. भारताच्या आकाश सिंगला 8 निलंबन गुण, तर रवीला 5 निलंबन गुण देण्यात आले आहेत. शिवाय रवीला सामन्यात आक्षेपार्ह भाषा वापरल्यामुळे रवीवर 2.5 कलम अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यासाठी त्याला अतिरिक्त 2 निलंबन गुण दिले आहेत.
Web Title: India vs Bangladesh, U 19 world cup final : Five players found guilty of breaching ICC Code of Conduct
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.