अँटिग्वा - वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्य १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाने जबदरस्त कामगिरी कायम ठेवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. शनिवारी झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशवर पाच विकेट्सनी दणदणीत विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. बांगलादेशविरुद्धच्या उपांत्यपूर्व लढतीत गोलंदाजांनी भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे बांगलादेशला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
आता उपांत्य फेरीत भारतीय संघाचा सामना हा ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. बुधवारी याच मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलियन संघाने उपांत्यपूर्व लढतीत पाकिस्तानवर मात केली होती. त्यामुळे भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघांमध्ये होणारा हा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे.
अवघ्या ११२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात ही निराशाजनक झाली. संघाचे खाते उघडण्यापूर्वीच हरनूर सिंग बाद झाला. त्यानंतर अंगकृष रघुवंशी आणि उपकर्णधार शेख रशिद यांनी ७० धावांची भागीदारी केली. अंगकृषने ४४ आणि शेख रशिदने २६ धावांची भागीदारी केली. मात्र ही जोडी फुटल्यावर बांगलादेशने पटापट विकेट्स मिळवत सामन्यात पुनगारमनाचा प्रयत्न केला. मात्र अखेरीस ३०.५ षटकांत भारताने पाच विकेट्स गमावून ११७ धावा जमवून सामना जिंकला. मराठमोळ्या कौशल तांबेने अखेरचा निर्णायक षटकार ठोकला आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. बांगलादेशकडून रिपोन मोंडल याने ४ बळी टिपले.
तत्पूर्वी भारताचा कर्णधार यश ढुलने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवला. अखेरीस बांगलादेशचा संपूर्ण संघ ३७.१ षटकात १११ धावांवर गारद झाला.
भारताकडून रवी कुमारने बांगलादेशच्या वरच्या फळीतील महफिजूल इस्लाम (२), इफ्ताखेर हुसेन (१) आणि पी. नवरोज नाबिल (७) यांना माघारी धाडले. अवघ्या ५६ धावांत बांगलादेशचे सात फलंदाज माघारी परतले होते. त्यानंतर एसएम महरोब आणि अशिकुर जमां यांनी ५० धावांची भागीदारी करत बांगलादेशला शंभरीपार पोहोचवले. अखेरीस बांगलादेशचा डाव १११ धावांवर आटोपला. भारताकडून रवीकुमार तीन आणि विकी ओस्तवाल याने दोन विकेट टिपल्या.