Join us  

India vs Bangladesh : भारताचा 'लै' भारी सराव! वर्ल्ड कपच्या तोंडावर टीम इंडियाची चाहत्यांना खुशखबर

भारताने आपल्या एकमेव सराव सामन्यात बांगलादेशचा दारूण पराभव केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2024 6:08 AM

Open in App

India vs Bangladesh Warm Up Match : भारताने आपल्या एकमेव सराव सामन्यात बांगलादेशचा दारूण पराभव केला. प्रथम फलंदाजीत मग गोलंदाजीत कमाल करून टीम इंडियाने ६० धावांनी विजय मिळवला. भारताने दिलेल्या १८३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ निर्धारित २० षटकांत ९ बाद केवळ १२२ धावा करू शकला. भारतीय गोलंदाजांनी सांघिक कामगिरी करून विजय साकारला. 

१८३ धावांचा बचाव करताना अर्शदीप सिंग (२), जसप्रीत बुमराह (१), मोहम्मद सिराज (१), हार्दिक पांड्या (१), अक्षर पटेल (१) आणि शिवम दुबे (२) अशी भारतीय गोलंदाजांची कामगिरी राहिली. बांगलादेशविरूद्धच्या सराव सामन्यात भारतीय फलंदाजांनी सराव म्हणून एक वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. कर्णधार रोहित शर्मा आणि संजू सॅमसनने डावाची सुरुवात केली. विराट कोहली नुकताच अमेरिकेत दाखल झाल्याने त्याला विश्रांती देण्यात आली. रिषभ पंतने अर्धशतकी खेळी करून विश्वचषकासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले. इतरही फलंदाजांचा सराव व्हावा या हेतूने पंतला निम्म्यातून तंबूत परतावे लागले. तो ३२ चेंडूत ५३ धावा करून नाबाद परतला.

तत्पुर्वी, भारताने निर्धारित २० षटकांत ५ बाद १८२ धावा केल्या. भारताकडून रोहित शर्मा (२३), संजू सॅमसन (१), रिषभ पंत (नाबाद ५३), सूर्यकुमार यादव (३१), शिवम दुबे (१४), हार्दिक पांड्या (नाबाद ४०) आणि रवींद्र जडेजा नाबाद (४) धावा करून माघारी परतला. बांगलादेशला सराव सामना जिंकण्यासाठी १८३ धावांची आवश्यकता होती, ज्यात त्यांना अपयश आले. हार्दिकने ४ षटकार आणि २ चौकार लगावले. त्याने डावाच्या सतराव्या षटकात षटकारांची हॅटट्रिक मारली. आयपीएलमध्ये फॉर्मसाठी संघर्ष करत असलेल्या पांड्याची ही खेळी म्हणजे भारतीय चाहत्यांसाठी सुखद धक्काच म्हणावा लागेल.  

सराव सामन्यासाठी दोन्हीही संघ -भारत - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, संजू सॅमसन, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.

बांगलादेश - नजमूल हुसैन शांतो (कर्णधार), तन्जीद हसन, Tawhid Hridoy, लिटन दास, शाकीब अल हसन, महमुदुल्लाह रियाद, जेकर अली, सौम्य सरकार, महेदी हसन, तन्वीर इस्लाम, शोरिफुल इस्लाम, रिशाद हुसैन, तन्जीद हसन साकीब. 

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024भारतीय क्रिकेट संघअर्शदीप सिंग