इंदूर : बांगलादेशविरुद्धचा पहिल्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस भारताताच राहीला. कारण भारताच्या गोलंदाजांनी फक्त १५० धावांमध्ये बांगलादेशचा पहिला डाव आटोपला. त्यानंतर भारताच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी केल्यामुळे त्यांची दिवसअखेर १ बाद ८६ अशी स्थिती आहे. त्यामुळे आता दुसऱ्या दिवशी मोठी आघाडी घेण्याचे स्वप्न भारतीय संघ बघत आहे. भारताचा संघ सध्या ६४ धावांनी पिछाडीवर आहे.
बांगलादेशच्या १५० धावांचा पाठलाग करताना भारताला रोहित शर्माच्या रुपात पहिला धक्का बसला. रोहितला फक्त सहा धावाच करता आल्या. पण त्यानंतर सलामीवीर मयांक अगरवाल आणि चेतेश्वर पुजारा यांनी दमदार फलंदाजी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.बांगलादेशचे सर्व फलंदाज अवघ्या 150 धावांत माघारी परतले. भारताकडून शमीनं सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. अश्विन, इशांत शर्मा आणि उमेश यादवनं प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. या सामन्यात भारताच्या जलदगती गोलंजांनी आठ विकेट्स घेतल्या.
बांगलादेशनं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरवताना पहिल्याच सत्रात सलामीवीरांना माघारी पाठवले. 2 बाद 12 अशा अवस्थेत सापडलेल्या बांगलादेशसाठी मोमिनूल हक ( कर्णधार) आणि मुश्फिकर रहीम ही जोडी धावली. तत्पूर्वी, मोहम्मद शमीनं बांगलादेशला तिसरा धक्का दिला. ही जोडी अश्विननं तोडली अन् बांगलादेशची अवस्था 4 बाद 99 अशी केली. अश्विननं मोमिनूल ( 37) याला बाद केलं. ही विकेट त्याच्यासाठी विक्रमी ठरली.
घरच्या मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये 250 विकेट्स पूर्ण करण्यासाठी अश्विनला केवळ एक फलंदाज बाद करावा लागणार होती. मोमिनूलची विकेट घेत त्यानं तो पल्ला गाठला. घरच्या मैदानावर 250 कसोटी विकेट घेणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरला. यापूर्वी अनील कुंबळे आणि हरभजन सिंग यांनी हा विक्रम केला आहे. घरच्या मैदानावर अनील कुंबळेच्या नावावर 350, तर हरभजन सिंगच्या नावावर 265 विकेट्स आहेत. त्यानंतर शमीनं बांगलादेशचा डाव गुंडाळला. बांगलादेशकडून मोमिनूल हक ( 37) आणि मुश्फिकर रहीम (43) यांनी संघर्ष केला.