बर्मिंगहॅम - भारताचा ऑफ स्पिनर आर अश्विन याने इंग्लंडविरूध्दच्या कसोटीचा पहिला दिवस गाजवला. ॲलेस्टर कुकचा अडथळा दूर करताना त्याने भारताला मोठे यश मिळवून दिले. या विकेटसह अश्विनने एक अनोखा विक्रम नावावर केला. डावाच्या सातव्या षटकात कर्णधार विराट कोहलीने अश्विनला पाचारण केले. कोहलीचा हा निर्णय अनेकांना आश्चर्यकारक वाटला,परंतु अश्विनने कुकचा त्रिफळा उडवून निर्णय योग्य असल्याचे सिध्द केले.
कुकला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 8 वेळा बाद करणारा अश्विन हा दुसरा ऑफ स्पिनर ठरला. ऑस्ट्रेलियाचा नॅथन लियॉन हा पहिला फिरकीपटू आहे. यामागोमग भारताच्याच रविंद्र जडेजाचा क्रमांक येतो. अश्विनने सर्वाधिकवेळा बाद करणा-या फलंदाजांमध्ये कुक दुस-या स्थानावर आहे. अश्विनने ऑस्ट्रेलियाच्या डेव्हीड वॉर्नरला नऊ वेळा बाद केले आहे. कुकने अश्विनविरूद्ध फलंदाजी करताना 789 चेंडूंत 46.28च्या सरासरीने 324 धावा केल्या आहेत.
पहिल्या दिवसअखेर अश्विनच्या नावावर 4 बाद 60 धावा अशी कामगिरी नोंदवली गेली. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया येथील अश्विनची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. तसेच भारतीय फिरकीपटूने आशिया खंडाबाहेर नोंदवलेली ही सर्वोत्तम कामगिरी आहे.