पुणे : कसोटी व टी-२० मालिकांमध्ये शानदार पुनरागमन करणारा भारतीय संघ विश्वविजेत्या इंग्लंडविरुद्ध मंगळवारपासून सुरू होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत विजयी सुरुवात करण्यास प्रयत्नशील राहील. या मालिकेत सलामीवीर शिखर धवनवर सर्वांची नजर राहील. कसोटी आणि टी-२० मालिकेत पहिला सामना गमावल्यानंतर भारताने जबरदस्त सुरुवात करत मालिका विजय मिळवला; मात्र एकदिवसीय सामन्यांची मालिका तीन सामन्यांचीच असल्याने सुरुवातीचा सामना गमावणे दोन्ही संघांसाठी महागडे ठरेल.
इंग्लंडने कसोटी आणि टी-२० मालिकेत विजयाने सुरुवात केली होती; पण या दोन्ही स्वरूपात त्यांना लय कायम राखण्यात अपयश आले. धवनसाठी ही मालिका विशेष महत्त्वाची आहे. तो पहिल्या टी-२० सामन्यात अपयशी ठरला. भारताकडे आघाडीच्या फळीत अनेक पर्याय आहेत. शुभमन गिल संघात असून, पृथ्वी शॉ व देवदत्त पडिक्कल हेही आपला दावा सादर करीत आहेत. अशा स्थितीत धवनसाठी ही लढत अग्निपरीक्षा आहे. रोहित शर्माच्या साथीने धवन डावाची सुरुवात करण्याची पूर्ण अपेक्षा आहे.
एकदिवसीय सामन्यामध्ये धवनला स्थिरावण्यास वेळ मिळतो आणि अशा स्थितीत तो मंगळवारी फॉर्ममध्ये परतण्याचा प्रयत्न करेल. कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिकेत चांगल्या खेळी केल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने आपले अखेरचे व ४३ वे शतक ऑगस्ट २०१९ मध्ये विंडीजविरुद्ध लगावले होते. लोकेश राहुल व ऋषभ पंत यांना अंतिम संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. राहुल मधल्या फळीत खेळेल. पंत तळाच्या फळीत हार्दिक पांड्यासोबत जबाबदारी पार पाडेल. अशा स्थितीत अंतिम संघामध्ये एका स्थानासाठी मुंबईचा श्रेयस अय्यर व सूर्यकुमार यादव यांच्यात स्पर्धा राहील. सूर्यकुमारने टी-२० मध्ये प्रभावित केले; तर अय्यर गेल्या काही दिवसांमध्ये मधल्या फळीत चांगली भूमिका बजावीत आहे. भुवनेश्वर कुमार गोलंदाजी विभागाचे नेतृत्व करील. त्याच्या जोडीला शार्दुल ठाकूरला नवा चेंडू हाताळण्याची जबाबदारी मिळू शकते. मोहम्मद सिराज व प्रसिद्ध कृष्णा यांचाही संघात समावेश आहे.
इंग्लंड विजयी शेवट करण्यास उत्सुकइंग्लंडही विजयाने दौऱ्याचा शेवट करण्यास उत्सुक असेल. कारण त्यांना चांगल्या सुरुवातीनंतरही कसोटी मालिकेत १-३ ने आणि टी-२० मालिकेत २-३ ने पराभव स्वीकारावा लागला. इंग्लंडसाठी कर्णधार मॉर्गन, जोस बटलर, जेसन रॉय व अष्टपैलू बेन स्टोक्स यांचा फॉर्म महत्त्वाचा आहे. या चारही फलंदाजांकडून कामगिरीत सातत्य अपेक्षित आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुडने आपल्या वेगाने भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजविले होते आणि आर्चर दुखापतग्रस्त झाल्यानंतर क्रिस जॉर्डन व युवा सॅम कुरेन यांच्यासह त्याच्यावर अतिरिक्त जबाबदारी असेल. मोईन अली संघासाठी पिंच हिटरची भूमिका बजावू शकतो.