Ind vs Eng 1st T20: पहिल्या टी-२० सामन्यात निवडकर्त्यांनी सुपरस्टार फलंदाज विराट कोहली आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत यांना विश्रांती दिली आहे. टीम इंडिया आज पहिल्या टी-२० सामन्यात इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हा संघ मैदानात उतरेल. अशा वेळी भारतीय संघात असे दोन खेळाडू आहेत जे विराट कोहली आणि ऋषभ पंतची जागा घेऊ शकतात. हे दोन स्टार खेळाडू आपल्या खेळाच्या जोरावर सामना फिरवण्यात पटाईत आहेत. हे दोनही खेळाडू कर्णधार रोहित शर्मासाठी फार फायद्याचे ठरू शकतात. चला जाणून घेऊया या खेळाडूंबद्दल...
पंतच्या जागी 'या' खेळाडूची वर्णी
सध्या ऋषभ पंत हा तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा नंबर वन यष्टिरक्षक फलंदाज आहे. पण दिनेश कार्तिक IPL 2022 मध्ये चांगला खेळ दाखवून टीम इंडियात परतला आहे. दक्षिण आफ्रिका मालिकेत त्याने अप्रतिम कामगिरी केली. त्याच्या खेळाच्या जोरावर तो टी-२० विश्वचषक खेळण्यासाठी मोठा दावेदार बनला आहे. तसेच IPL 2022 च्या १६ सामन्यांमध्ये त्याने सहाव्या क्रमांकावर येऊन ३३० धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत अनुभवी विकेटकिपर म्हणून त्याला पंतच्या जागी संधी दिली जाऊ शकते.
नंबर ३ साठी कोहलीला 'या' खेळाडूचा पर्याय
विराट कोहलीच्या जागी दीपक हुडा तिसऱ्या क्रमांकावर उतरू शकतो. दीपकने आपल्या बॅटने आयर्लंड दौरा गाजवला. त्याच्याकडे कोणत्याही परिस्थितीत फटकेबाजी करण्याची क्षमता आहे. दीपकने आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात ४७ धावांची आणि दुसऱ्या T20 सामन्यात १०४ धावांची तुफानी खेळी केली. दीपकने इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत जर चांगला खेळ दाखवला, तर त्याला टी-२० विश्वचषकासाठीही जागा मिळू शकते.