बर्मिंगहॅम : इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यांत बळींचे शतक पूर्ण केले आहे. दिनेश कार्तिकला शून्यावर त्रिफळाचीत करत स्टोक्सने आपला शंभरावा बळी दिमाखात साजरा केला.
स्टोक्सने 2013 साली अॅडलेड येथे झालेल्या अॅशेस मालिकेतील सामन्यात कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कला 148 धावांवर बाद करत इंग्लंडला मोठे यश मिळवून दिले होते. क्लार्क हा स्टोक्सचा पहिला बळी ठरला होता. या सामन्यात इंग्लंडला 218 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.
भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी स्टोक्सने कसोटी कारकिर्दीतील शंभर बळींचा टप्पा गाठला. उपहारानंतर स्टोकची गोलंदाजी चांगलीच भेदक झाली होती. अजिंक्य रहाणेला तंबूत धाडत स्टोक्सने 99 बळी पूर्ण केले. त्यानंतरच्याच तिसाव्या षटकात स्टोक्सने कार्तिकला त्रिफळाचीत केले आणि बळींचे शतक पूर्ण केले.