बर्मिंगहम : आपल्या हजाराव्या सामन्यात इंग्लंडच्या संघाने भारताचा 31 धावांनी पराभव केला. शनिवारी जेव्हा सामना सुरु झाले तेव्हा तो दोलायमान अवस्थेत होता. भारतीय फलंदजांनी काही काळ किल्ला लढवला खरा, पण त्यांच्या पदरी पराभव पडला. इंग्लंडने भारताचा दुसरा डाव 162 धावांवर आटोपत दमदार विजय मिळवला. इंग्लंडचा युवा अष्टपैलू खेळाडू सॅम कुरनला यावेळी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
विराट कोहली खेळपट्टीवर असल्यामुळे भारतीय संघ विजय मिळवेल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. विराटने 51 धावांची खेळी साकारली. त्याला हार्दिक पंड्याची चांगली मिळत होती. त्यावेळी भारतीय संघ हा सामना जिंकेल, अशी चर्चा सुरु झाली होती. पण बेन स्टोक्सने कोहलीला पायचीत पकडले आणि भारताच्या विजयाच्या आशा मावळल्या.
विराट बाद झाल्यावर भारताची आशा पंड्यावर होती. मर्यादीत षटकांच्या सामन्यात तुफानी फलंदाजी करणारा हार्दिक आता भारताला सामना जिंकवून देऊ शकतो, असा काही जणांना विश्वास होता. पण तळाच्या फलंदाजांबरोबर कशी फलंदाजी करायची असते, हे त्याला माहिती नसल्याचेच दिसून आले. स्टोक्सनेच त्याला स्लीपमध्ये झेल द्यायला भाग पाडले आणि इंग्लंडने विजयोत्सवाला सुरुवात केली.