- अयाझ मेमन, कन्सल्टिंग एडिटर, लोकमतसलामीच्या कसोटीत भारताने पहिल्या दोन दिवसांत केवळ आठ गडी बाद केले. इंग्लंडने मात्र तब्बल ५५५ धावा काढून कोणता संघ उत्तम आहे, हे दाखवून दिले. दौरा सुरू होण्याआधी तुलनेत दुबळ्या मानल्या गेलेल्या इंग्लंडने धावडोंगराकडे वाटचाल करीत विजयासाठी सर्व शक्यता निर्माण करून ठेवल्या. ज्यो रुटवर हा संघ सर्वाधिक विसंबून असल्याचे चित्र सामन्याआधी निर्माण झाले होते. तज्ज्ञांनी तर भारताला कसोटीत क्लीन स्वीप करता येईल, असे मत मांडले. काहींनी २-० ने, तर काहींनी २-१ ने मालिका विजय मिळेल, असे संकेत दिले. सुरुवातीला अशी भाकिते योग्य नसतात. इंग्लंडने जी सुरुवात केली, ती पाहता तज्ज्ञांचा अंदाज फोल ठरेल, असे दिसते.पाटा खेळपट्टीची साथ त्यांच्या यशात मोलाची ठरेल, यात शंका नाही. सुरुवातीचे काही दिवस चेपॉकची खेळपट्टी फलंदाजांना पूरक असल्याचे मानले जाते. नंतर ती वेगवान आणि फिरकी माऱ्याला साथ देते. ही बाब इंग्लंडसाठी लाभदायी ठरू शकेल. ज्यो रुटचे द्विशतक, डोम सिब्लेची लाभलेली साथ तसेच बीेन स्टोक्स, रोरी बर्न्स आणि जोस बटलर यांनी देखील चांगले योगदान दिले. इंग्लंडने उभारलेल्या या धावा भारतापासून विजय हिरावून नेणाऱ्या ठरू शकतात.रुटने आपल्या खेळीत काही ऐतिहासक टप्पे गाठले. इंग्लंडकडून सर्वाधिक धावा काढणाऱ्यांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानी आला. तीन कसोटींत त्याचे हे दुसरे द्विशतक आहे. मागच्या पाच डावांत त्याने १५० च्या वर धावा काढल्या. न्यूझीलंडच्या कर्णधाराइतक्या त्याच्या यंदा ६४४ धावा झाल्या आहेत.रुटची धावांची भूक पाहता जागतिक कसोटी विश्वात सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये त्याची गणना होते. गेल्या दोन महिन्यांत त्याने धावा काढण्याचा धडाका लावला. त्यामुळे स्मिथ, कोहली आणि विलियम्सन यांच्या मागे असलेला रुट आता पुढे जाताना दिसतो.पाटा खेळपट्टीवर इंग्लंडला विशाल धावसंख्या उभारण्यापासून रोखण्यासाठी भारताला काही करता आले असते का?यापूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे गोलंदाजांनी कसून मेहनत घेतली, पण संघ निवडीबाबत काही प्रश्न उपस्थित होतात. ईशांत शर्माला संघात स्थान देण्यासाठी भारतातर्फे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सर्वाधिक बळी घेणारा मोहम्मद सिराज याला बेंचवर बसावे लागले आहे. युवा ऐवजी अनुभवाला प्राधान्य देण्यात आले. ईशांतनेही चांगला मारा करीत निवड योग्य असल्याचे सिद्ध केले.अशा पाटा खेळपट्टीवर मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने करणे आवश्यक आहे. भारतीय संघाने काही झेल सोडले. त्यामुळे रुट-स्टोक्स यांच्यादरम्यानची भागीदारी बहरण्यास मदत झाली. दिवसाच्या तिसऱ्या सत्रात रोहितने बेसचा सोपा झेल सोडला. जोस बटलर बाद झाल्यानंतर रुट डाव घोषित करीत भारतीय सलामीवीरांना काही षटके फलंदाजी करण्यास भाग पाडेल, असे वाटत होते. पण, त्याने दिवसभर फलंदाजी करण्याचा निर्णय घेत भारतीय खेळाडूंना मानसिकदृष्ट्या थकविण्यावर भर दिला. माझ्या मते त्याचा हा निर्णय बचावात्मक होता. पण, इंग्लंडने मात्र आतापर्यंत या लढतीत वर्चस्व गाजवले आहे. खेळपट्टीचे स्वरूप बदलले नाही तरी विशाल धावसंख्येचे भारतीय संघावर दडपण राहील, हे मात्र नक्की.कुलदीप यादवकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे. जडेजासारख्या गोलंदाजाच्या स्थानी अक्षर पटेलला पहिली पसंती देण्यात आली होती, पण त्याच्या दुर्दैवाने सामन्याच्या दिवशी तो दुखापतग्रस्त झाला. कुलदीप ऐवजी अखेरच्या क्षणी शाहबाज नदीमला अंतिम संघात स्थान मिळाले. कदाचित नदीमकडे स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्याचा अनुभव असून अचूक मारा करण्याची त्याची क्षमता लक्षात घेता त्याला पसंती देण्यात आली असावी. जर कुलदीप पहिली किंवा दुसरी पसंती नसेल तर त्याची संघात निवड का करण्यात आली? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. या सामन्यात आतापर्यंत काय घडले त्यासाठी हे कारणे सयुक्तिक नाही. भारतीय संघाच्या दुर्दशेचे महत्त्वाचे कारण म्हणजे सुमार क्षेत्ररक्षण हे आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- India vs England 1st Test: इंग्लंडचा धावडोंगर भारताकडून विजय हिरावणारा ठरू शकतो
India vs England 1st Test: इंग्लंडचा धावडोंगर भारताकडून विजय हिरावणारा ठरू शकतो
दौरा सुरू होण्याआधी तुलनेत दुबळ्या मानल्या गेलेल्या इंग्लंडने धावडोंगराकडे वाटचाल करीत विजयासाठी सर्व शक्यता निर्माण करून ठेवल्या.
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2021 5:25 AM