चेन्नई : आघाडीच्या फळीतील फलंदाजांचे अपयश, चेतेश्वर पुजाराच्या शतकी खेळीची वाढती प्रतीक्षा आणि ऋषभ पंतचे ‘नर्व्हस नाइंटिज’सोबत घट्ट होत असलेले नाते या कारणांमुळे भारतीय संघ इंग्लंडविरूद्ध पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशीही रविवारी बॅकफुटवर असल्याचे चित्र दिसले. भारताने तिसऱ्या दिवसअखेर ६ बाद २५७ धावांची मजल मारली आहे. भारतीय संघ इंग्लंडच्या पहिल्या डावातील धावसंख्येच्या तुलनेत ३२१ धावांनी पिछाडीवर आहे. त्यामुळे यजमान संघावर फॉलोऑनचे सावट आहे. इंग्लंडने पहिल्या डावात कर्णधार ज्यो रुट (२१८), डोमनिक सिब्ले (८७) व बेन स्टोक्स (८२) यांच्या कामगिरीच्या जोरावर पहिल्या डावात ५७८ धावांची मजल मारली.दिवसअखेर वॉशिंग्टन सुंदर (६८ चेंडूंमध्ये नाबाद ३३) आणि रविचंद्रन अश्विन (५४ चेंडूंमध्ये नाबाद ८) यांनी दिवसातील अखेरची १७ षटके खेळून काढत सातव्या विकेटसाठी ३२ धावांची अभेद्य भागीदारी केली. त्यामुळे मजबूत स्थितीत असेलल्या इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ लढत अनिर्णीत राखण्यात यशस्वी ठरण्यासाठी प्रयत्नशील आहे.भारताची एकवेळ ४ बाद ७३ अशी अवस्था होती. त्यानंतर पुजारा व पंत यांनी पाचव्या विकेटसाठी ११९ धावांची भागीदारी केली. पुजारा दुर्दैवीपणे बाद झाला. बेसच्या आखुड टप्प्याच्या चेंडूवर त्याचा पुलचा फटका शॉट लेगला तैनात क्षेत्ररक्षकाच्या खांद्याला लागून क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावला. पंत मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात डीप कव्हरला झेल देत माघारी परतला. तो आपल्या १७ कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत चौथ्यांदा ९० नंतर शतक पूर्ण करण्यात अपयशी ठरला. पंतच्या खेळीत ९ चौकार व जॅक लीचविरुद्ध लगावलेल्या पाच षटकारांचा समावेश आहे. त्याआधी, बुमराहने बेसला (३४) पायचित करत भारताला आज पहिले यश मिळवून दिले तर अश्विनने अँडरसनला बोल्ड करत इंग्लंडचा डाव गुंडाळला. जॅक लीच १४ धावांवर नाबाद राहिला. विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टिने महत्त्वाच्या असलेल्या या मालिकेतील पहिल्या कसोटीत सुरुवातीचे दोन दिवस भारतीय गोलंदाजांनी संघर्ष केल्यानंतर मदार फलंदाजांवर होती. पण, केवळ पुजारा (७३) व पंत (९१) यांनी अर्धशतके झळकावली. मात्र, त्यांना वैयक्तिक तिहेरी धावसंख्या नोंदवता आली नाही. खेळपट्टी अद्याप फलंदाजीसाठी अनुकूल आहे, पण भारताने आपले दोन्ही सलामीवीर रोहित शर्मा (६) व शुभमन गिल (२९) यांना सकाळच्या सत्रात गमावले. या दोघांना वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने (२-५२) तंबूचा मार्ग दाखविला. कर्णधार विराट कोहली (११) आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे (१) दुसऱ्या सत्रात फिरकीपटू डॉमनिक बेसचे (४-५५) लक्ष्य ठरले. धावफलकइंग्लंड पहिला डाव :- रोरी बर्न्स झे. पंत गो. अश्विन ३३, डोमिनिक सिब्ले पायिचत गो. बुमराह ८७, डॅनियल लॉरेन्स पायचित गो. बुमराह ००, ज्यो रुट पायचित गो. नदीम २१८, बेन स्टोक्स झे. पुजारा गो. नदीम ८२, ओली पोप पायचित गो. अश्विन ३४, जोस बटलर त्रि. गो. ईशांत ३०, डॉम बेस पायचित गो. बुमराह ३४, जोफ्रा आर्चर त्रि. गो. ईशांत ००, जॅक लीच नाबाद १४, जेम्स अँडरसन त्रि. गो. अश्विन ०१. अवांतर (४५). एकूण १९०.१ षटकांत सर्वबाद ५७८. बाद क्रम : १-६३, २-६३, ३-२६३, ४-३८७, ५-४७३, ६-४७७, ७-५२५, ८-५२५, ९-५६७, १०-५७८. गोलंदाजी : ईशांत २७-७-५२-२, बुमराह ३६-७-८४-३, अश्विन ५५.१-५-१४६-३, नदीम ४४-४-१६७-२, सुंदर २६-२-९८-०, रोहित शर्मा २-०-७-०.भारत पहिला डाव :-रोहित शर्मा झे. बटलर गो. आर्चर ०६, शुभमन गिल झे. अँडरसन गो. आर्चर २९, चेतेश्वर पुजारा झे. बर्न्स गो. बेस ७३, विराट कोहली झे. पोप गो. बेस ११, अजिंक्य रहाणे झे. रुट गो. बेस ०१, ऋषभ पंत झे. लीच गो. बेस ९१, वॉशिंग्टन सुंदर खेळत आहे ३३, रविचंद्रन अश्विन खेळत आहे ०८. अवांतर (५). एकूण ७४ षटकांत ६ बाद २५७. बाद क्रम : १-१९, २-४४, ३-७१, ४-७३, ५-१९२, ६-२२५. गोलंदाजी : अँडरसन ११-३-३४-०, आर्चर १६-३-५५-२, स्टोक्स ६-१-१६-०, लीच १७-२-९४-०, बेस २३-५-५५-४, रुट १-०-१-०.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- India vs England 1st Test: आघाडीचे फलंदाज अपयशी; भारताच्या आशा आता तळाच्या फलंदाजांवर
India vs England 1st Test: आघाडीचे फलंदाज अपयशी; भारताच्या आशा आता तळाच्या फलंदाजांवर
पंत व पुजारा यांची अर्धशतके, यजमान संघावर फॉलोऑनचे सावट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2021 4:11 AM