विजयासमीप येऊन पराभव पदरी पाडून घ्यायचा, ही पूर्वापार पासून चालू आलेली परंपरा भारताच्या संघाने इंग्लंडमध्ये पहिल्या सामन्यात जपली. या मैदानात यापूर्वी भारत सहा सामने खेळला होता, त्यापैकी एकही सामना भारताला जिंकता आला नव्हता, ही परंपराही कायम राहीली आहे. सामना चांगलाच रंगतदार झाला. विराट कोहली, सॅम कुरन, आर. अश्विन, इशांत शर्मा, बेन स्टोक्स यांनी यामध्ये चांगले रंग भरले. पण पुन्हा एकदा हाता तोंडाशी आलेला घास भारताकडून हिरावला गेला, याचे शल्य त्यांच्या चाहत्यांना नक्कीच असेल.
सामन्याच्या निवडीपासूनच भारताच्या चुका होत गेल्या. चेतेश्वर पुजारासारख्या तंत्रशुद्ध फलंदाजाला संघात न खेळवणं, हे अनाकलनीय होतं. कसोटी क्रिकेटचा संघ निवडताना पुजारा आणि लोकेश राहुल यांची तुलना होऊ शकते, हे भारतीय संघ व्यवस्थापनाचे विचार ' विचार ' करायला लावणारे आहेत. शिखर धवन हा विदेश दौऱ्यात अपयशी ठरत असताना त्याला संधी द्यायची आणि पुजाराला बाहेर बसवायचे, हा अजब न्याय आहे. मोहम्मद शमीसारख्या गोलंदाजाला, जो चेंडू चांगला स्विंग करतो त्याला डावाचे सारथ्य करायला देऊ नये, हे कर्णधार कोहलीचे अपयश आहे.
दुसऱ्या डावात कोहली बाद झाल्यावर भारताला मोठा धक्का बसला. पण कॉलर टाईट करून हार्दिक पंड्या खेळपट्टीवर उभा होता. आपल्या कॉलरसारखी देशाची कॉलर उंचावण्याची त्याच्याकडे संधी होती. पण तळाच्या फलंदाजांबरोबर कशी फलंदाजी करायची, हे त्याला कुणीच शिकवले नसल्याचे दिसून आले. पहिल्या चेंडूवर एकेरी धाव घेऊन तो पुढचे चेंडू तळाच्या फलंदाजाला चेंडू खेळायला लावत होता. चेंडूचे अर्धशतक झाल्यावर पंड्या मोठे फटके मारताना दिसत नव्हता. जे कोहलीने पहिल्या डावात केलं, ते जर पंड्या करू शकला असता, तर सामन्याचा निकाल भारताच्या बाजूने लागला असता.
इंग्लंडने पहिल्या डावात चांगला खेळ केला. त्यांच्या फलंदाजांना शतके झळकावता आली नसली तरी त्यांनी आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. त्यानंतर भारताच्या फलंदाजांना आपला स्विंगचा मारा त्यांनी दाखवला. कोहली हा अपवाद ठरला. कारण त्याने भारताला तारले. त्याच्या धावा झाल्या नसत्या तर हा सामना अजून लवकर संपू शकला असता. या खेळीत त्याला 0, 21 आणि 51 या धावसंख्येवर जीवदान मिळाले होते. तोदेखील अडखळत खेळत होता. पण त्याच्या जिद्दीने त्याला तारले. थोडा संयम त्याने दाखवला आणि त्याचा धावा झाल्या.
सॅम या युवा खेळाडूची कामगिरी नेत्रदीपक अशीच होती. त्यामुळेच तो सामनावीराचा मानकरी ठरला. भारताची सलामीची जोडी पहिल्या डावात रंगात येत असताना ती सॅमनेच फोडली. भारताला एकामागून एक तीन धक्के त्याने दिले. त्यानंतर जेव्हा संघाला दुसऱ्या डावात गरज होती तेव्हा खेळपट्टीवर तो उभाही राहीला.
हा सामना लक्षात राहील तो कोहली, सॅम आणि सुटलेल्या झेलांसाठी. भारताकडूनच फक्त झेल सुटले नाहीत. तर यजमानांच्या हातूनही झेल निसटले. कॅचेस विन्स द मॅचेस, असं म्हटलं जातं. त्यामुळे हे सुटलेले झेल इंग्लंडला जास्तकरून महाग पडले. नाहीतर कोहली शून्यावर तंबूत परतला असता आणि त्यांचा एकतर्फी विजय झाला असता.
आता क्रिकेटच्या पंढरीत म्हणजेच लॉर्ड्सवर दुसरा कसोटी सामना होणार आहे. गेल्या दौऱ्यात भारताला या मैदानात विजय मिळवता आला होता. अजिंक्य रहाणेचे शतक झाले होते, तर इशांत शर्माने दुसऱ्या डावात बाऊन्सर्सच्या जोरावर सात बळी मिळवत संघाला 95 धावांनी विजय मिळवून दिला होता. या गोष्टी भारताला सुखावणाऱ्या आहेत. पण यामध्येच रमायच की विजय प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मेहनत घ्यायची, हे भारतीय संघाने ठरवायचं आहे.