बर्मिंगहॅम : इंग्लंडच्या दौऱ्यात भारताचा कर्णधार विराट कोहली किती धावा करतो, यावर सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आपल्या शंभराव्या चेंडूवर कोहलीने चौकारासह अर्धशतक पूर्ण केले. इंग्लंडमधील कसोटी सामन्यांतील कोहलीची सर्वाधिक खेळी ठरली आहे.
कोहलीला इंग्लंडच्या 2014 साली झालेल्या दौऱ्यातील पाच सामन्यांमध्ये फक्त 134 धावाच करता आल्या होत्या. गेल्या दौऱ्यात कोहलीने अनुक्रमे 39,28,25,20,8,7,6,1,0,0 अशा धावा केल्या होत्या. त्यामुळे इंग्लंडमधील कसोटी सामन्यांत कोहलीचे हे पहिले अर्धशतक ठरले आहे. कोहलीने आपल्या शंभराव्या चेंडूवर बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर चौकार वसूल केला आणि आपले पहिले-वहिले शतक साजरे केले.
जीवदानांचा फायदा कोहलीने घेतला
कोहली आणि जेम्स अँडरसन यांच्यातील युद्ध पहिल्या सामन्यातही पाहायला मिळाले. कोहली जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा तो शून्यावर असताना अँडरसनच्या गोलंदाजीवर त्याला जीवदान मिळाले. अँडरसनच्या गोलंदाजीवर कोहली चकला आणि गलीमध्ये उभ्या असलेल्या जो रूटच्या हातून त्याचा झेल सुटला. त्यानंतर कोहली 21 धावांवर असतानाही अँडरसनच्या गोलंदाजीवर कोहलीला जीवदान मिळाले होते. यावेळी डेव्हिड मलानने कोहलीला जीवदान दिले. अर्धशतक झळकावल्यावर त्यानंतरच्याच चेंडूवर कोहलीला जीवदान मिळाले. स्टोक्सच्या गोलंदाजीवर मलानने पुन्हा एकदा कोहलीचा झेल सोडला, त्यावेळी कोहली 51 धावांवर होता. कोहलीला आपल्या नाबाद 51 धावांच्या खेळीत तीन वेळा जीवदान मिळाले.