बर्मिंगहॅम : भारताच्या सलामीवीरांनी दमदार फलंदाजी केली. भारताला अर्धशतक झळकावून दिले. हे दोघे आता संघाला मोठी धावसंख्या उभारून देणार असे वाटत होते. त्याचवेळी भारताला फक्त नऊ धावांमध्ये तीन धक्के बसले. हे धक्के देणारा ना अँडरसन होता ना ब्रॉड, आपला दुसरा सामना खेळणारा सॅम कुरन दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात ठरला होता भारताचा कर्दनकाळ. आपल्या दुसऱ्याच सामन्यात सॅम कुरनने भारताची दांडी गूल केली आणि त्यांना पिछाडीवर ढकलले. सॅमच्या भेदक गोलंदाजीमुळे इंग्लंडला उपहाराच्यावेळी भारताला 21 षटकांमध्ये 3 बाद 76 या धावसंख्येपर्यंत रोखता आले
कुरनचा हा दुसराच कसोटी सामना आहे. या वर्षीच जून महिन्यात कुरनने पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात पदार्पण केले होते. त्यावेळी अर्धशतक झळकावून स्थरस्थावर झालेल्या शादाब खानला कुरनने बाद करत इंग्लंडला मोठे यश मिळवून दिले होते. हा कपरनचा कसोटीमधील पहिला बळी होता. या सामन्यात त्याने दोनदा शाबादला बाद केले होते.
भारताने दमदार अर्धशतकी सलामी दिली होती. पण कुरनने भेदक मारा करत भारताच्या धावसंख्येवर अंकुश लावला. मुरली विजयला पायचीत पकडत कुरनने भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर लोकेश राहुलला त्रिफळाचीत केले आणि शिखर धवनला झेल देण्यास भाग पाडत कुरनने भारताच्या तिसऱ्या खेळाडूला तंबूत धाडले. शिस्तबद्ध वेगवान मारा, हे यावेळी कुरनच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाले.