मुंबई - इंग्लंड भूमीत पहिलेच कसोटी शतक झळकावून विराट कोहलीनेक्रीडाविश्वाची शाब्बासकी मिळवली. या मालिकेत भारतीय संघापेक्षा विराटची कामगिरी कशी होती याचीच उत्सुकता अधिक होती. त्याने पहिल्याच डावात आपण किती परिपक्व झालोत हे दाखवून दिले. त्याच्या या खेळीचे क्रिकेट जगतात कौतुक झाले. पण, त्यात सचिन तेंडुलकरचे चार शब्द विराटला अधिक सुखावणारे ठरले.
विराटने २०१८ मधील दुसरे शतक गुरूवारी झळकावले. मात्र या शतकी खेळीबरोबरच त्याने सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली. तेंडुलकरनंतर एडबॅस्टन येथे शतक ठोकणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. त्यात तेंडुलकरने केलेले कौतुक म्हणजे विराटसाठी दुग्धशर्करा योगच. सचिनने ट्विट केले की, विराट कोहलीची ही खेळी संघासाठी खूप महत्त्वाची आहे. कसोटी मालिकेत याहून चांगली सुरूवात होऊ शकत नाही. कसोटी शतकासाठी विराटला शुभेच्छा.