बर्मिंगहॅम - एडबॅस्टन कसोटीचा पहिला दिवस भारताचा आर. आश्विन आणि इंग्लंडचा जो रुट यांच्या नावावर राहिला. इंग्लंडने पहिल्या सत्रात वर्चस्व गाजवले. उपहारानंतर मोहम्मद शमीच्या दोन विकेटने भारताला सामन्यात कमबॅक करून दिले. मात्र पहिल्या सत्रात चर्चा रंगली ती प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या डुलकीची. उपहारानंतर शास्त्री मास्तरांना पेंग आली आणि सोशल मीडिया जागे झाले.
अॅलेस्टर कुक आणि किटन जेनिंग्स यांनी इंग्लंडच्या डावाची सुरुवात केली. उमेश यादवच्या गोलंदाजीवर चौकार लागल्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीने आश्चर्यकारकरित्या चेंडू अश्विनच्या हातात सोपवला. अश्विनने एका अप्रतिम चेंडूवर कुकचा त्रिफळा उडवत भारताला पहिले यश मिळवून दिले.
मात्र कर्णधार जो रूट आणि जेनिंग्स यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागिदारी करून इंग्लंडला सावरले. उपहारापर्यंत यजमानांनी १ बाद ८३ धावा केल्या होत्या. शमीने उपहारानंतर जेनिंग्स आणि डेविड मलानला बाद करत भारताला कमबॅक करून दिले. दुसऱ्या सत्रात भारताने २६ षटकांत २ विकेट घेत ८० धावा दिल्या. भारतीय संघ चांगली कामगिरी करत असताना प्रशिक्षक शास्त्री मात्र पेंगत असल्याचे कॅमेरामनने टिपले.