भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा वनडे सामना कटक येथील बाराबती स्टेडियमवर रंगणार आहे. जवळपास सहा वर्षांनी भारतीय संघ या मैदानात वनडे सामना खेळायला उतरणार आहे. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० अशी आघाडी मिळवल्यावर सलग दुसऱ्या विजयासह मालिका जिंकण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरले. दुसरीकडे पाहुणा इंग्लंडचा संघ हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्यासाठी जोर लावताना दिसेल. या वनडे लढती आधी जाणून घेऊयात कसा आहे कटकच्या मैदानातील वनडे सामन्यांचा रेकॉर्ड? भारत-इंग्लंड यांच्यात इथं किती सामने खेळवले गेले अन् त्यात कोण ठरलंय भारी त्यासंदर्भातील स्टोरी
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कटकच्या मैदानात आतापर्यंत किती वनडे सामने झाले? कसा आहे या मैदानातील रेकॉर्ड?
कटकच्या बाराबती स्टेडियमवर आतापर्यंत २१ वनडे सामने खेळवण्यात आले आहेत. यातील १९ सामन्यात भारतीय संघ मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. या मैदानात खेळवण्यात आलेल्या २१ वनडेतील २ सामने अनिर्णित राहिले असून १२ सामन्यात धावांचा पाठलाग करणाऱ्या संघानं हे मैदान मारलं आहे. फक्त ७ सामन्यात पहिल्यांदा फंलदाजी करणाऱ्या संघाला इथं विजय मिळाला आहे. कटकच्या खेळपट्टीवर पहिल्यांदा फलंदाजी करतानाची सरासरी धावसंख्या २२५-२३० धावा अशी आहे.
कटकच्या मैदानात भारत-इंग्लंड यांच्यात १० वनडे सामने; कुणाचा राहिला दबदबा? भारतीय संघानं कटकच्या बाराबती स्टेडियमवर इंग्लंड विरुद्ध १० वनडे सामने खेळले आहेत. यातील ६ सामन्यात टीम इंडियानं बाजी मारलीये. उर्वरित ४ सामन्यात पाहुण्या इंग्लंड संघाने मैदान गाजवलं आहे. २०१७ मध्ये या मैदानात भारत-इंग्लंड यांच्यातील अखेरचा सामना खेळवण्यात आला होता. हा शेटवचा सामना भारतीय संघानेच जिंकला होता. २०१७ मध्येच भारतीय संघाने या मैदानात वनडे सर्वोच्च सांघिक धावसंख्या उभारली होती. निर्धारित षटकात भारतीय संघानं या मैदानात ३८१ धावा केल्या होत्या.
या मैदानातील अखेरच्या वनडेत युवी-धोनीनं मारली होती सेंच्युरी
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने १९ जानेवारी २०१९ रोजी कटकच्या मैदानात इंग्लंड विरुद्ध अखेरचा सामना खेळला होता. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताच्या ताफ्यातील दोघांनी कडक सेंच्युरी मारली होती. युवराज सिंग याने १२७ चेंडूत २१ चौकार आणि ३ षटकारासह १५० धावा कुटल्या होत्या. त्याच्याशिवाय महेंद्रसिंह धोनीनं १२२ चेंडूत १३४ धावांची दमदार खेळी केली होती. त्याच्याभात्यातून १० चौकार आणि ६ षटकार पाहायला मिळाले होते.