भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना चेन्नईच्या चेपॉकच्या मैदानात रंगणार आहे. या सामन्याआधी भारतीय संघाला धक्क्यावर धक्का बसला आहे. एका बाजूला पहिल्या सामन्यात स्फोटक फलंदाजी करणारा अभिषेक घोट्याला दुखापत झाल्यामुळे प्लेइंग इलेव्हनमधून आउट झाला असताना आता ऑलराउंडर नितीशकुमार रेड्डीनं मालिकेतूनच माघार घेतली आहे. दुखापतीमुळे त्याच्यावर स्पर्धेतून बाहेर पडण्याची वेळ आल्याचे समजते. ईएसपीएन क्रिकइन्फाच्या वृत्तानुसार नितीशकुमार यादवनं इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेतून माघार घेतल्यावर त्याच्या जागी शिवम दुबेची टीम इंडियात एन्ट्री झाली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
थेट आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नितीशकुमार रेड्डी
दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यातून माघार घेतल्यावर नितीशकुमार रेड्डी आता थेट आयपीएल स्पर्धेतूनच क्रिकेटच्या मैदानात उतरल्याचे पाहायला मिळू शकते. आयपीएलमध्ये तो सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यातील प्रमुख खेळाडू आहे. याआधी झिम्बाब्वे विरुद्धच्या टी-२०- सामन्यातही दुखापतीमुळे त्याच्यावर मालिकेला मुकण्याची वेळ आली होती. यावेळीही शिवम दुबेलाच त्याच्या बदली खेळाडूच्या रुपात संघात स्थान देण्यात आले होते. शिवम दुबे २८ जानेवारीला राजकोटच्या मैदानात रंगणाऱ्या तिसऱ्या टी-२० सामन्यावेळी भारतीय संघाच्या ताफ्यात सामील होईल अशी अपेक्षा आहे.
शिवम दुबेची टी-२० तील कामगिरी
शिवम दुबे मागील वर्षी श्रीलंकेविरुद्ध भारताकडून अखेरचा सामना खेळला होता. दुखापतीमुळे तो संघाबाहेर पडला होता. फिटनेस सिद्ध करून त्याने देशांतर्गत क्रिकेटमधून दमदार कमबॅक केल्याचे पाहायला मिळाले. पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यात नितीशकुमार रेड्डीनं धमाकेदार कामगिरी केल्यावर इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी शिवम दुबेला मागे ठेवून नितीशकुमार रेड्डीला संघात सामील करुन घेण्यात आले होते. आता तो दुखापतग्रस्त झाल्यामुळे धाकड ऑलराउंड शिवम दुबेसाठी पुन्हा टीम इंडियाचे दरवाजे उघडल्याचे दिसते. शिवम दुबेनं आतापर्यंत ३३ सामन्यात जवळपास १३५ च्या सरासरीनं ४४८ धावा काढल्या आहेत. त्याच्या खात्यात ११ विकेट्सही जमा आहेत.