India vs England 2nd Test : दुसरा कसोटी सामना : इंग्लंडविरुद्ध एकूण १५४ धावांची आघाडी; पुजारा, रहाणे यांनी सावरले, पण...

India vs England 2nd Test : चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांनी शतकी भागीदारी करत भारताला सावरले. खराब प्रकाशमानामुळे खेळ लवकर थांबविण्यात आला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 05:19 AM2021-08-16T05:19:16+5:302021-08-16T05:20:11+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 2nd Test : 154-run lead against England | India vs England 2nd Test : दुसरा कसोटी सामना : इंग्लंडविरुद्ध एकूण १५४ धावांची आघाडी; पुजारा, रहाणे यांनी सावरले, पण...

India vs England 2nd Test : दुसरा कसोटी सामना : इंग्लंडविरुद्ध एकूण १५४ धावांची आघाडी; पुजारा, रहाणे यांनी सावरले, पण...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन : गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत इंग्लंडला पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्यापासून रोखल्यानंतर भारतीय फलंदाजांवर मोठी जबाबदारी होती. मात्र प्रमुख फलंदाजांच्या हाराकिरीमुळे भारताचा डाव अडचणीत आला. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत चौथ्या दिवसअखेर भारताने ८२ षटकांत ६ बाद १८१ धावा करत १५४ धावांची आघाडी मिळवली. चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांनी शतकी भागीदारी करत भारताला सावरले. खराब प्रकाशमानामुळे खेळ लवकर थांबविण्यात आला.
प्रमुख फलंदाज स्वस्तात परतल्याचा भारताला फटका बसला. इंग्लंडने भारताच्या ३६४ धावांचा पाठलाग करताना ३९१ धावा करत २७ धावांची माफक आघाडी घेतली. यानंतर इंग्लंडने २७ धावांतच लोकेश राहुल आणि रोहित शर्मा असे महत्त्वपूर्ण बळी मिळवत भारताला बॅकफूटवर नेले. पुजारा-रहाणे यांनी भारताला काही प्रमाणात पुनरागमन करून दिले.
इंग्लंडची आघाडी मागे टाकेपर्यंत दोन्ही सलामीवीर गमावल्याचा धक्का भारतीय पचवत असतानाच पुढच्या २८ धावांत कर्णधार विराट कोहलीचा बहुमूल्य बळी गमावल्याने भारताची २३.१ षटकांत ३ बाद ५५ धावा अशी अवस्था झाली. येथून भारताला सावरले ते पुजारा व रहाणे यांनी. दोघांनी मोक्याच्या वेळी टीकाकारांना उत्तर देत चौथ्या गड्यासाठी १०० धावांची भागीदारी केली. परंतु, दोघेही खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर बाद झाल्याने पुन्हा भारताचा डाव घसरला. पुजाराने तब्बल २०६ चेंडूंचा सामना करत ४५ धावा केल्या, तर रहाणेने १४६ चेंडूंत ६१ धावा केल्या.
फिरकीपटू मोईन अलीने रहाणेसह धोकादायक रवींद्र जडेजाला (३) बाद करत इंग्लंडला घट्ट पकड मिळवून दिली. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऋषभ पंत नाबाद १४ धावांवर टिकून होता. सोबत इशांत शर्मा (४*) असून आता भारताच्या आशा पंतवर आहेत. वेगवान गोलंदाज मार्क वूड याने ३, मोईन अलीने २, तर सॅम कुरनने एक बळी घेत भारताला धक्के दिले.

धावफलक 
भारत (पहिला डाव) : १२६.१ षटकांत सर्व बाद ३६४ धावा.
इंग्लंड (पहिला डाव) : १२८ षटकांत सर्व बाद ३९१ धावा.
भारत (दुसरा डाव) : लोकेश राहुल झे. बटलर गो. वूड ५, रोहित शर्मा झे. मोईन गो. वूड २१, चेतेश्वर पुजारा ४५, विराट कोहली झे. बटलर गो. कुरन २०, अजिंक्य रहाणे ६१, ऋषभ पंत खेळत आहे १४, रवींद्र जडेजा त्रि. गो. मोईन ३, इशांत शर्मा खेळत आहे ४. अवांतर - ८. एकूण : ८२ षटकांत ६ बाद १८१ धावा.
बाद क्रम : १८-१, २७-२, ५५-३, १५५-४, १६७-५, १७५-६.
गोलंदाजी : जेम्स अँडरसन १८-६-२३-०; ओली रॉबिन्सन १०-६-२०-०; मार्क वूड १४-३-४०-३; सॅम कुरन १५-३-३०-१; मोईन अली २०-१-५२-२, जो रुट ५-०-९-०.

दीप्तीला मिळाला मान
 भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार अष्टपैलू दीप्ती शर्मा हिला रविवारी चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी लॉर्ड्स स्टेडियमवरील घंटी वाजवण्याचा मान मिळाला. 
लॉर्ड्स क्रिकेट मैदानाने ट्विटरवर फोटो अपलोड करत म्हटले की, ‘आज सकाळी लॉर्ड्समध्ये घंटी वाजवण्यासाठी दीप्ती शर्माचे स्वागत करताना आनंद होत आहे.’ २००७ सालापासून या ठिकाणी दिवसाचा खेळ सुरू होण्याआधी घंटी वाजवण्याची परंपरा एमसीसीने सुरू केली. 
 भारताची आघाडीची अष्टपैलू असलेली दीप्ती सध्या ‘दी हंड्रेड’ स्पर्धेसाठी इंग्लंडमध्ये आहे. २३ वर्षीय दीप्तीने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात मिळून ११६ आंतरराष्ट्रीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्त्व केले आहे. सोशल मीडियावर दीप्तीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर क्रिकेटप्रेमींनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

लॉर्ड्सच्या प्रांगणात फडकला तिरंगा! 
भारतीय क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स स्टेडियमच्या प्रांगणात ध्वजारोहण करत ७५वा स्वातंत्र्य दिन साजरा केला. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या हस्ते भारतीय संघाने ध्वजारोहण केले. यानंतर सर्वांनी तिरंग्याला मानवंदना देत राष्ट्रगीत गायले. बीसीसीआयने या प्रसंगाचा व्हिडीओ आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट केला असून, हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. 
 

Web Title: India vs England 2nd Test : 154-run lead against England

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.