लंडन : ‘लोकेश राहुलने शानदार शतक झळकवले. त्याने फलंदाजीदरम्यान कोणतेही विचार केले नाहीत आणि दडपण न घेता खेळी केली. त्याने जी योजना आखली होती, त्यानुसार त्याने फलंदाजी केली,’ असे सांगत भारताचा फलंदाज रोहित शर्माने राहुलचे कौतुक केले. पहिल्या डावात रोहितने राहुलसह भारताला शतकी सलामी देताना शानदार अर्धशतक झळकवले.रोहितने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, ‘मी आतापर्यंत राहुलला फलंदाजी करताना पाहिले आहे. त्यात त्याची ही सर्वोत्तम खेळी होती. पहिल्या चेंडूपासून तो नियंत्रणात होता. तो गोंधळल्यासारखा कधीही वाटला नाही. आपल्या योजनांनुसार तो ठामपणे खेळत होता. जेव्हा तुम्हाला तुमच्या योजनांवर विश्वास असतो, तेव्हा यश नक्कीच मिळतं. माझ्यामते हा त्याचा दिवस होता आणि त्याचा त्याने पूर्ण फायदा घेतला.’ राहुलसोबत शतकी सलामी दिल्याने भारताला मजबूत स्थितीत येता आले. याबाबत रोहित म्हणाला की, ‘कसोटी क्रिकेटचे वेगळेच आव्हान आहे. तुम्ही भले अत्यंत आक्रमक असाल, पण जेव्हा परिस्थिती विपरित असते, तेव्हा तुम्हाला संयमाने खेळावे लागते. विशेष करून नव्या चेंडूने. पण त्यानंतर खेळपट्टीचा अंदाज आल्यावर मात्र तुम्ही हळूहळू काही आक्रमक फटके खेळण्याचा प्रयत्न करू शकता.
आम्हीही येथे परिस्थितीनुसार खेळ केला आणि त्यानंतर नैसर्गिक फटके मारले. संघातील सर्व फलंदाजांना आपल्यावरील जबाबदाऱ्यांची कल्पना आहे. प्रत्येकजण आपल्या भूमिके नुसार खेळत आहे.’रोहित आणि राहुल यांनी पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये डावाची सुरुवात केली आहे. याबाबत काही चर्चा झाली होती का, असे विचारले असता रोहित म्हणाला की, ‘खरं म्हणजे आमच्यात कोणतीही चर्चा झाली नाही. कारण राहुल पहिला सामना खेळणार नव्हता. त्या सामन्यात मयांक अग्रवाल खेळणार होता. दुर्दैवाने मयांकच्या डोक्याला दुखापत झाली आणि राहुलला संघात स्थान मिळाले. त्यानंतर मैदानावर आम्ही कशाप्रकारे खेळी करावी, याबाबत चर्चा केली. कसोटी क्रिकेटमध्ये मी पहिल्यांदा राहुलसोबत खेळलो, पण त्याच्यासोबत मी अनेकदा फलंदाजी केलेली आहे.’रोहितचा सॅल्युटव्हर्च्युअल पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने १५ ऑगस्टला सामना संपु शकतो का, असा प्रश्न केला त्यावर रोहितने त्या पत्रकाराला सॅल्युट केला पत्रकाराने म्हटले होते की, जर भारताला हा कसोटी सामना जिंकला तर तो स्वातंत्र्य दिन आणखी खास बनेल त्यावर रोहितने म्हटले की, सॅल्युट सर, तुमचा विचार नक्कीच चांगला आहे. असे होऊ शकते.