लंडन - भारतीय संघ यजमान इंग्लंडचा सामना करण्यासाठी लॉर्ड्सवर दाखल झाला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुरूवारपासून सुरू होणार आहे. भारतीय संघाने लॉर्ड्सवर 17 कसोटी सामने खेळले आहेत आणि भारताला त्यापैकी 11 सामन्यांत पराभव पत्करावा लागला, तर केवळ दोनच विजय मिळवले आहेत. 1971च्या दौ-यात अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भारताने यजमानांना प्रथमच अनिर्णीत निकालावर समाधान मानण्यास भाग पाडले होते. 1986ला कपिल देव यांच्या भारतीय संघाने इंग्लंडला लॉर्ड्सवर नमवण्याचा पराक्रम केला आणि 2014 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या संघाने त्याची पुनरावृत्ती केली.
कपिल आणि धोनी यांच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी विराटला आहे. भारतीय संघाला पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेलीत सलामीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला आहे. आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या भारतीय संघाकडून झालेल्या निराशाजनक कामगिरीवर टीका झाली. त्यामुळे लॉर्ड्स कसोटीत भारताकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा नक्की असेल. 9 ऑगस्टपासून दुस-या कसोटीला सुरूवात होत आहे.
कपिल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 1986चा दौरा गाजवला. क्रिकेटच्या पंढरीत अर्थात लॉर्ड्सवर भारतीय संघाने प्रथमच इंग्लंडला कसोटीत पराभूत करण्याचा पराक्रम केला होता. भारताने डेव्हिड गोवर यांच्या इंग्लंड संघावर 5 विकेट्स राखून विजय मिळवला होता. त्यानंतर तब्बल 28 वर्षांनी धोनीच्या शिलेदारांनी भारताला हा सुवर्णक्षण अनुभवण्याची संधी दिली. भारतीय संघाने 95 धावांनी इंग्लंडवर विजय मिळवला होता. विशेष म्हणजे विराट कोहली त्या विजयाचा साक्षीदार होता आणि चार वर्षानंतर त्याच्याच कर्णधारपदाखाली भारतीय संघ इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाला आहे.