पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल-हक याची ओळख अत्यंत चिवट फलंदाज म्हणून आहे. शरीराने जाडजूड असलेला हा खेळाडू धावण्यात कधीच चपळ नव्हता. त्यामुळेच चोरटी धाव घेणे त्याने कटाक्षाने टाळले आणि कधी घेतली तर तो अनेकदा धावबादच झाला. भारताच्या चेतेश्वर पुजाराच्या बाबतीतही तसेच घडत आहे. इंझमामसारखा अवाढव्य नसला तरी धावबाद होण्याच्या विक्रमात पुजाराने भारतीयांना मागे टाकले आहे. म्हणून चेतेश्वरचा इंझमाम होईल, अशी भीती व्यक्त होत आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा पहिला डाव १०७ धावांत संपुष्टात आला. पावसाच्या व्यत्ययामुळे ही लढत सतत थांबवण्यात येत होती. पहिले दोन गडी बाद झाल्यानंतर पाऊस आला. थोड्या वेळात खेळ सुरू होताच भारताला तिसरा झटका बसला. २५ चेंडू खेळून पुजारा केवळ एक धाव काढून धावबाद झाला.
अन्य संघाच्या तुलनेतही पुजारा आघाडीवर आहे. २०१० पासून सर्वाधिक सात वेळा पुजारा धावबाद झाला आहे. या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेले श्रीलंकेचा रंगना हेराथ आणि न्यूझीलंडचा रॉस टेलर प्रत्येकी पाच वेळा धावबाद झालेले आहेत. त्यापाठोपाठ प्रत्येकी चार वेळा धावबाद होणाऱ्या हाशिम आमला ( दक्षिण आफ्रिका ) आणि अझर अली ( पाकिस्तान) यांचा क्रमांक येतो.