लॉर्ड्स - भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत ४ बाद ८९ अशा अवस्थेत सापडलेल्या इंग्लंड संघासाठी जॉनी बेअरस्टो आणि ख्रिस वोक्स ही जोडी धावून आली. त्यांनी तुफान खेळी करताना लॉर्ड्स कसोटीत भारताच्या गोलंदाजीची चांगलीच धुलाई केली. बेअरस्टोचे शतक सात धावांनी हुकले असले तरी ती कसर वोक्सने भरून काढली. वोक्सने कसोटी कारकिर्दीतले पहिले शतक झळकावले आणि लॉर्ड्सच्या ऑनर बोर्डावर स्वतःचे नाव नोंदवले.
लॉर्ड्सवर दहा विकेट आणि शतक झळकावणारा तो पाचवा खेळाडू आहे. यापूर्वी हा विक्रम गब्बी ॲलन, कैथ मिलर, इयान बोथम आणि स्टुअर्ट ब्रॉड यांच्या नावे आहे. पाच विकेट आणि शतक या विक्रमात त्याने अँड्य्रू फ्लिंटॉफ, रे इलिंग्वर्थ, कैथ मिलर, बेन स्टोक्स आणि विनू मंकड यांच्याशी बरोबरी केली. लॉर्ड्सच्या खेळपट्टीवर वोक्सने नेहमीच कमाल केली आहे. फलंदाजीत त्याने शंभरहून अधिक सरासरीने धावा केल्या आहेत, तर गोलंदाजीत दहापेक्षा कमी सरासरी ठेवली आहे. अशी कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू आहे. येथे खेळलेल्या तीन सामन्यांत त्याने १२२च्या सरासरीने २४४ धावा केल्या आहेत आणि ९.३३ च्या सरासरीने १६ विकेट घेतल्या आहेत.