India vs England 2nd Test ( Marathi News) : भारताचा युवा फलंदाज शुबमन गिलसाठी १२ महिन्यांचा कालावधी किती विरोधाभासी आहे. मागील वर्षी त्याने श्रीलंका आणि न्यूझीलंड विरुद्ध वनडे आणि ट्वेंटी-२०त मध्ये मौजमजेसाठी शतकं झळकावली होती. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने पहिले कसोटी शतक नोंदवले होते. त्यामुळेच अनेकांनी त्याला विराट कोहलीचा वारसदार म्हणून घोषित केले होते. पण, २०२४ ची परिस्थिती वेगळीच आहे. तो सध्या फॉर्माशी झगडतोय.
विशाखापट्टणम येथील दुसऱ्या कसोटीत इंग्लंडविरुद्ध त्याला ३४ धावा करता आल्या. गिल मिळणाऱ्या संधी वाया घालवतोय. तेच यशस्वी जैस्वालने संधीचं दोन्ही हाताने स्वागत करताना शतक झळकावले. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान डेंग्यूमधून बरा झाल्यानंतर गिलचा फॉर्म हरवलेला दिसतोय. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने तिसऱ्या क्रमांकावर काही सुरेख खेळी केल्या आहेत. पण, सध्या तो टीकेच्या तोंडावर आहे. त्यात भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी गिलला इशारा दिला आहे. त्यांनी चेतेश्वर पुजाराचं नाव घेऊन गिलला सतर्क राहण्यास सूचवले आहे.
''हा युवा संघ आहे. या युवा खेळाडूंनी स्वतःला सिद्ध केले आहे. पण, हे विसरू नका की पुजारा वाट पाहतोय. रणजी करंडक स्पर्धेत तो सातत्याने धावा करतोय आणि कसोटी संघात पुनरागमनासाठी तो नेहमी तयार आहे,''असे शास्त्री म्हणाले. पुजाराने सौराष्ट्रकडून खेळताना रणजी करंडक स्पर्धेत झारखंडविरुद्ध द्विशतक झळकावले. त्यानंतर त्याने ४९, ४३, ४३, ६६ आणि ९१ अशा सातत्याने धावा केल्या आहेत. तेच दुसरीकडे गिलला मागील काही कसोटींत तिसऱ्या क्रमांकावर २, २६, ३६, १०, २३ आणि ० अशा धावा करता आल्या आहेत.
दुसऱ्या कसोटीचे समालोचन करताना शास्त्री म्हणाले, ही कसोटी मॅच आहे. तुम्हाला खेळपट्टीवर उभं राहण्याची गरज आहे. अन्यथा तुम्ही संकटात याल. तुम्हाला तुमचा खेळ दाखवायला हवा. विशेषतः जेम्स अँडरसनसारखा महान गोलंदाज समोर असताना...
Web Title: India vs England 2nd Test - 'Don't forget... Pujara is waiting': Ravi Shastri warns as Shubman Gill
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.