लंडन - इंग्लंडने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे आणि गुरूवारपासून सुरूवात होणा-या दुस-या कसोटीत भारतीय संघाला पुन्हा नमवण्यासाठी यजमानांनी कंबर कसली आहे. एडबॅस्टन कसोटीत कर्णधार विराट कोहली वगळता भारताच्या इतर फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली होती. पण, लॉर्ड्सवरील दुस-या कसोटीत विराटला बाद करण्याचा विशेष मंत्र इंग्लंडचे प्रशिक्षक ट्रॅवेस बेलिस यांनी दिला आहे.
ते म्हणाले, की 'विराट कोहलीने पहिल्या व दुस-या डावात चांगला खेळ केला. पण, आमच्या गोलंदाजांनी भारताच्या अन्य फलंदाजांना झटपट बाद केले, तर विराटवर दडपण निर्माण होईल आणि त्याच्याकडून चूक होऊ शकते. त्यामुळे त्याला बाद करण्यासाठी भारताच्या इतर फलंदाजांना खेळपट्टीवर अधिक काळ टिकू न देणे ही आमची रणनिती असेल.
पहिल्या कसोटीत भारताला 31 धावांनी पराभव पत्करावा लागला होता. या कसोटीत विराटने पहिल्या डावात शतक आणि दुस-या डावात अर्धशतक झळकावले होते. बेलिस म्हणाले,' पहिल्या कसोटीच्या चारही डावात विकेट पडल्या आणि सर्व फलंदाजांना खेळपट्टीवर तग धरण्यासाठी संघर्ष करावा लागला. विराटलाहा सुरूवातीला झगडावे लागले. फलंदाजांसाठी ती आव्हानात्मक विकेट होती.
पहिल्या सामन्याला कलाटणी देणा-या बेन स्टोक्सचा लॉर्ड्स कसोटीसाठी संघात समावेश करण्यात आलेला नाही. त्याच्या जागी ख्रिस वोक्सला संधी मिळाली आहे आणि त्याच्याकडून बेलिस यांना चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.