भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्याला अवघ्या काही मिनिटांत सुरूवात होणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ 0-1 अशा पिछाडीवर आहे आणि त्यांना मालिकेत टिकून राहण्यासाठी लॉर्ड्सवर जिंकावे लागणार आहे. लॉर्ड्स मैदानावरील इतिहास भारताच्या बाजूने नसला तरी विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली हा संघ चमत्कार करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यांचे मनोबल उंचावणारी आनंदाची बातमी समोर आली आहे. सामन्याचे निकाल भारताच्या बाजूने झुकवणारा धागा सापडला आहे आणि तसे घडल्यास आपला विजय पक्काच समजा.
भारतीय संघाने लॉर्ड्सवर 17 कसोटी सामने खेळले आहेत आणि भारताला त्यापैकी 11 सामन्यांत पराभव पत्करावा लागला, तर केवळ दोनच विजय मिळवले आहेत. 1971च्या दौ-यात अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली भारताने यजमानांना प्रथमच अनिर्णीत निकालावर समाधान मानण्यास भाग पाडले होते. 1986ला कपिल देव यांच्या भारतीय संघाने इंग्लंडला लॉर्ड्सवर नमवण्याचा पराक्रम केला आणि 2014 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या संघाने त्याची पुनरावृत्ती केली. आता कोहलीही तशी कामगिरी करू शकतो आणि तशी संधी त्याला चालून आली आहे.
यजमान म्हणून इंग्लंडने लॉर्ड्सवर वर्चस्व गाजवले आहे. 1884 ते 2018 पर्यंत 134 सामन्यांत त्यांनी 53 विजय मिळवले आहेत, तर 49 सामने अनिर्णीत राखले आहेत. केवळ 32 सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. या आकडेवारीनुसार या सामन्याचे पारडे इंग्लंडच्या बाजूने असले तरी भारत बाजी मारू शकेल. इंग्लंडने 21 जुलै 2011 मध्ये लॉर्ड्सवर भारताला अखेरचे नमवले होते. त्यानंतर येथे यजमानांना एकदाच आशियाई संघाला पराभूत करता आलेले नाही.
मागील 7 वर्षांत इंग्लंडने लॉर्ड्सवर आशियाई संघांविरूद्ध सहा सामने खेळले आणि त्यापैकी 2011 चा भारताविरूद्धचा विजय वगळता इंग्लंडच्या वाट्याला अपयशच आले आहे. त्यांना तीन सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे आणि दोन सामने अनिर्णीत राहिले आहेत. 24 मे 2018 मध्ये पाकिस्तानने लॉर्ड्सवरच यजमानांना 9 विकेट राखून नमवले होते. त्यामुळे आशियाई संघांविरूद्ध लॉर्ड्सवरील मागील सहा सामन्यांचा निकाल पाहता भारताच्या विजयाचे चान्सेस वाढले आहेत.