ठळक मुद्देपहिल्या कसोटीत सलामीवीर शिखर धवन, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल हे झटपट बाद झाले, कारण त्यांनी हलक्या हाताने चेंडू खेळले नाहीत.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या लढतीत भारताचा पराभव झाला. कारण ठरले फलंदाजी. जर भारताचा कर्णधार विराट कोहलीला एका फलंदाजाची जरी सुयोग्य साथ मिळाली असती कर निकाल बदलला असता. या गोष्टीचा अर्थ भारताच्या फलंदाजांमध्ये गुणवत्ता नाही, असा होत नाही. तर त्यांनी आपली मानसिकता बदलायला हवी. भारतीय फलंदाजांनी जर आपली मानसिकता बदलली तर निकाल नक्कीच बदलू शकतो.
पहिल्या सामन्यात कोहलीच्या बॅटमधून धावा निघाल्या, याचे मुख्य कारण त्याने बदललेली मानसिकता आहे. कोहली हा काही तंत्रशुद्ध फलंदाजांच्या यादीत मोडत नाही. पण तरीही त्याच्याकडून धावा झाल्या. कारण त्याने वातावरण, खेळपट्टी आणि गोलंदाज यांना जाणून फलंदाजी केली. दुसरीकडे अजिंक्य रहाणे हा तंत्रशुद्ध फलंदाज असला तरी त्याच्याकडून जास्त धावा झाल्या नाहीत. इंग्लंडमध्ये गेल्यावर फलंदाजी करण्यासाठी तुम्ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे.
भारतीय फलंदाज हे मर्यादीत षटकांच्या मुशीत वाढलेले आहेत. मर्यादीत षटकांच्या सामन्यांत चेंडूवर चाल करून फटकेबाजी करायची असते. तुम्ही जास्त चेंडू निर्धाव सोडू शकत नाही. पण कसोटी क्रिकेटमध्ये मात्र याच्या उलट तुम्हाला करायचे असते. तुम्ही जेव्हा जास्तीत जास्त चेंडू सोडाल तेव्हा गोलंदाजाला आपल्या गोलंदाजीची दिशा आणि टप्पा बदलावा लागतो. त्याचबरोबर इंग्लंडमध्ये फलंदाजी करताना चेंडूवर जायचे नसते, तर चेंडूला बॅटवर यायला द्यायचे असते. इंग्लंडमध्ये फलंदाजी करताना चेंडूची वाट बघून, तुम्ही थांबून फटकेबाजी केली तर तुमच्या धावा होऊ शकतात.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, स्विंग होणारा चेंडू खेळण्याचीही एक मानसीकता आहे. भारतात पाटा खेळपट्टी असते. चेंडू स्विंग होण्याचा संबंध नसतो. पण इंग्लंडमध्ये बदलणारे वातावरण आणि खेळपट्टी यामुळे चांगला स्विंग होतो. त्यामुळे चेंडू स्विंग होत असेल तेव्हा हलक्या ग्रिपने तो खेळला गेला पाहिजे. जर तुम्ही हार्ड ग्रिपने चेंडू खेळायला गेलात तर तुमचा झेल सहज उडू शकतो. पहिल्या कसोटीत सलामीवीर शिखर धवन, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल हे झटपट बाद झाले, कारण त्यांनी हलक्या हाताने चेंडू खेळले नाहीत.
दुसरा कसोटी सामना क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्सवर आहे. गेल्या दौऱ्यात या पंढरीत भारताने विजयाचा पताका उडकवला होता. यावेळीही विजयी ध्वज फडकावून भारताला मालिकेत १-१ अशी बरोबरी करण्याची संधी आहे, पण त्यासाठी भारताच्या फलंदाजांनी धावा करणे महत्त्वाचे आहे. त्यांच्याकडून जर धावा झाल्या. भारताने धावांचा डोंगर रचला तर त्यांना विजयाची सर्वाधिक संधी असेल.
Web Title: India vs England 2nd Test: Indian batsmen will change thinking then results change
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.