भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुस-या कसोटीत पाहुण्यांनी पुन्हा शरणागती पत्करली. पावसाच्या व्यत्ययामुळे लॉर्ड्स कसोटीतील बराच खेळ वाया गेला. त्यात भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या 107 धावांत संपुष्टात आल्याने चाहत्यांचा हिरमोड झाला. एडबॅस्टन कसोटीतील पराभवानंतर भारतीय संघाकडून लॉर्ड्सवर पुनरागमनाची अपेक्षा होती, परंतु जेम्स अँडरसनच्या भेदक मा-यासमोर भारतीय फलंदाजांनी हार पत्करली.
भारताकडून आर. अश्विन (२९) व कर्णधार विराट कोहली (२३) यांनी सर्वाधिक धावा केल्या. कोहलीने ५७ चेंडूत २ चौकारांसह २३ धावा केल्या. अजिंक्य रहाणेही (१८) विशेष छाप पाडू शकला नाही. तळाच्या फळीत अश्विनने ३८ चेंडूत ४ चौकारांसह २९ धावा करत चांगली झुंज दिली. मात्र तो परतल्यानंतर भारताचा डाव झटपट गुंडाळला गेला.
लॉर्ड्सच्या शंभर वर्षांच्या इतिहासात कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लवकर माघारी परतलेला भारत हा दुसरा संघ ठरला आहे. भारताचा संपूर्ण संघ 35.2 षटकांत माघारी फिरला. यापूर्वी 2000 मध्ये झिम्बाब्वेचा पहिला डाव 30.3 षटकांत गडगडला होता. याशिवाय लॉर्ड्सवरील भारताची ही दुसरी लाजिरवाणी कामगिरी आहे. 1974मध्ये भारताचा संपूर्ण संघ 17 षटकांत 42 धावांत माघारी परतला होता.
याशिवाय तीन वर्षांनंतर भारताच्या सलामीच्या तिन्ही फलंदाजांना एकेरी धावा काढूनच माघारी परतावे लागले. लॉर्ड्सवर मुरली विजय (0), लोकेश राहुल (8) आणि चेतेश्वर पुजारा (1) यांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. यापूर्वी 2015च्या श्रीलंकेविरूद्ध कोलंबो येथे झालेल्या कसोटीत दुस-या डावात भारताचे आघाडीचे तिन्ही फलंदाज एकेरी धावसंख्येवर माघारी परतले होते.