इंग्लंड आणि भारत यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना अवघ्या काही तासांत लॉर्ड्सवर सुरू होईल. या लढतीतून भारतीय संघ मालिकेत पुनरागमन करेल का, विराट कोहली पुन्हा शतक झळकावेल का, 2014 च्या विजयाची पुनरावृत्ती होईल का, असे अनेक प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात घोळत आहेत. पण, या सामन्यात भारताच्या इशांत शर्माकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत. लॉर्ड्सवर तो भारतासाठी 'लॉर्ड' ठरण्यासाठी सज्ज आहे.
एडबॅस्टन कसोटीत इशांतने दोन्ही डावांत मिळून सहा विकेट घेतल्या होत्या. या कामगिरीसह त्याने कसोटी कारकिर्दीत 244 विकेटचा पल्ला गाठला आणि चंद्रशेखर यांच्या 242 विकेटचा विक्रम मोडला. भारताकडून सर्वाधिक कसोटी विकेट घेणा-या गोलंदाजांमध्ये इशांत सातव्या स्थानावर आहे. या क्रमवारीत अनिल कुंबळे ( 619) आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ कपिल देव ( 434), हरभजन सिंग (417), आर अश्विन ( 323), जहीर खान ( 311) आणि बिशनसिंग बेदी ( 266) यांचा क्रमांक येतो.
लॉर्ड्स कसोटीतही इशांतला दुहेरी विक्रम करण्याची संधी आहे. 2011 आणि 2014 मालिकेत लॉर्ड्स कसोटीत इशांतने एकूण 11 विकेट घेतल्या आहेत. लॉर्ड्सवर सर्वाधिक विकेट घेणा-या भारतीय गोलंदाजांमध्ये इशांत माजी क्रिकेटपटू झहीर खानसह संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहे. या क्रमवारीत बिशनसिंग बेदी आणि कपिल देव प्रत्येकी 17 विकेटसह अव्वल, तर अनिल कुंबळे 12 विकेटसह दुस-या स्थानावर आहे. इशांतने आजपासून सुरू होणा-या कसोटीत सहा किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेतल्यात लॉर्ड्सवर सर्वात यशस्वी भारतीय गोलंदाजाचा मान त्याच्या शिरपेचात खोवला जाईल.
इंग्लंड दौ-यात सर्वाधिक कसोटी विकेट घेण्याचा विक्रमही मोडण्याची संधी इशांतला आहे. त्याच्या नावावर आठ सामन्यांत 31 विकेट्स आहेत. याही विक्रमात कपिल देव 43 विकेटसह अव्वल स्थानी आहेत. त्यापाठोपाठ अनिल कुंबळे ( 36), बिशनसिंग बेदी (35), बी.एस. चंद्रशेखर (31) आणि झहीर खान (31) यांचा क्रमांक येतो. त्यामुळे इशांतला हाही विक्रम मोडण्याची संधी आहे.