लंडन : जेम्स अँडरसन म्हणजे इंग्लंडच्या गोलंदाजीतील मुख्य अस्त्र. त्याच्याकडे असलेला अनुभवाचा आतापर्यंत इंग्लंडच्या संघाला चांगलाच फायदा झालेला आहे. भारताविरुद्धचा दुसरा सामना काही वेळातच क्रिकेटच्या पंढरीत म्हणजेच लॉर्ड्सवर सुरु आहे. या सामन्यात अँडरसनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ' हा ' पराक्रम खुणावत आहे.
अँडरसनने इंग्लंडकडून कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी मिळवले आहेत. सध्याच्या घडीला कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या खात्यात ५४४ बळी आहेत. भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात जर त्याने सहा बळी मिळवले तर तो ५५० बळींचा मैलाचा दगड गाठू शकतो. त्याचबरोबर कसोटी क्रिकेटमध्ये ५५० बळी मिळवणारा तो दुसरा वेगवान गोलंदाज ठरणार आहे, त्याच्यापुढे ऑस्ट्रेलियाचा माजी महान मध्यमगती गोलंदाज ग्लेन मॅग्रा आहे.
पहिल्या कसोटी सामन्यात अँडरसनने भेदक मारा केला होता. पण त्याला दोन्ही डावांत प्रत्येकी दोन बळी मिळवता आले होते. त्याच्या गोलंदाजीवर काही झेल सुटले, नाहीतर पहिल्याच सामन्यात त्याने हा मैलाचा दगड गाठला असता. या सामन्यात सहा बळी मिळवून नवा पराक्रम करण्यासाठी अँडरसन सज्ज झाला आहे.