मुंबई- भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने इंग्लंड दौऱ्यात कर्णधार विराट कोहलीला दमदार फलंदाजी करत रहा असा सल्ला दिला आहे. दिल्लीकर कोहलीने भल्याभल्या गोलंदाजांना आपल्या तालावर नाचवले आहे. २०१४ च्या इंग्लंड दौऱ्यातील अपयश मागे सोडून देताना त्याने पहिल्या कसोटीत बहारदार खेळ केला. तरीही भारताला ३१ धावांनी पराभव पत्करावा लागला.
इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर कोहली वगळता भारताच्या इतर खेळाडूंनी शरणागती पत्करली. कोहलीने दोन्ही डावांत मिळून दोनशे धावा केल्या. त्यामुळे लॉर्ड्स कसोटीला सुरूवात होण्यापूर्वी भारतरत्न तेंडुलकरने कोहलीला सल्ला दिला आहे. कोहलीने लोकं काय म्हणतात याचा फार विचार न करता धावा करतच राहाव्यात अशी इच्छा तेंडुलकरने व्यक्त केली आहे.
तो म्हणाला,' कोहली आपली जबाबदारी योग्यपणे पार पाडत आहे आणि त्याने पुढेही तसाच खेळ करावा. आजूबाजूला काय घडतयं याचा फार विचार न करता खेळावर लक्ष केंद्रित करावे. एखाद्या खेळीनंतर तुम्ही समाधानी होता, तेव्हा तुमच्या घसरणीला सुरुवात होते. आनंदी होण्यात काहीच वावगे नाही, परंतु त्याचे समाधानात रूपांतर होऊ देता नये. गोलंदाज केवळ दहाच विकेट घेऊ शकतात.पण, फलंदाजांना तशी मर्यादा नसते.'
एडबॅस्टन कसोटीत कोहलीने दोन्ही डावात अनुक्रमे 149 आणि 51 धावांची खेळी केली. या खेळीमुळे त्याने आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला मागे टाकून अव्वल स्थान पटकावले होते. सचिन तेंडुलकरनंतर अव्वल स्थानावर विराजमान होणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला.