लंडन : पावसाच्या व्यत्ययामुळे लॉर्ड्स कसोटी सामन्याला अजूनही सुरुवात होऊ शकलेली नाही. पावसामुळे दोन्ही संघांनी कोणत्या खेळाडूंना संघात स्थान दिले आहे, हेदेखील समजू शकलेले नाही. पण भारताच्या माजी दिग्गज खेळाडूंनी या सामन्यात फिरकीपटू कुलदीप यादवला खेळवा, असा एक महत्त्वाचा सल्ला भारताचा कर्णधार विराट कोहलीला दिला आहे.
लॉर्ड्सची खेळपट्टी स्पोर्टींग असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांनाही मदत मिळेल, असे दिसत आहे. त्याळे आर. अश्विनबरोबर कुलदीपला या सामन्यात संधी देण्यात यावी, असे मत भारताचे माजी महान फलंदाज सुनील गावस्कर आणि सौरव गांगुली यांनी व्यक्त केले आहे.
गावस्कर याबाबत म्हणाले की, " खेळपट्टीचा नूर पाहता भारतीय संघात दोन फिरकीपटू असावेत, असे मला वाटते. कारण ही खेळपट्टी काही दिवसांत फिरकीला पोषक असेल. त्यावेळी जर अश्विनला कुलदीपची साथ मिळाली तर सामन्याचा निकाल भारताच्या बाजूने लागण्यास मदत होऊ शकते. "
कुलदीपला संघात स्थान देण्याबाबत गांगुली म्हणाला की, " लॉर्ड्सच्या खेळपट्टीचा इतिहास पाहिला, तर ही खेळपट्टी फिरकीला चांगली मदत करू शकते. त्यामुळे या सामन्यात कुलदीपला स्थान द्यायला हवे. भारताने या सामन्यात पाच गोलंदाजांसह उतरायला हवे. या पाच गोलंदाजांमध्ये दोन फिरकीपटूंचा समावेश असायला हवा. "