India vs England 2nd Test Live Update ( Marathi News ) : भारत-इंग्लंड दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचे पहिले सत्र इंग्लंडच्या नावावर राहिले. जेम्स अँडरसन याने पहिल्या तीन षटकांत रोहित शर्मा व यशस्वी जैस्वाल या भारताच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवले. शुबमन गिल व श्रेयस अय्यर यांनी ८० धावांची भागीदारी करून भारताचा डाव सावरला, परंतु इंग्लंडने पुनरागमन करून पुन्हा दोन विकेट्स मिळवल्या. टॉम हार्टलीच्या गोलंदाजीवर फटका मारायला गेलेल्या श्रेयसचा अफलातून झेल बेन स्टोक्सने घेतला, तर रजत पाटीदारचाही सुरेख झेल यष्टिरक्षक बेन फोक्सने टिपला. स्टोक्सने २२ मीटर पळत जाऊन झेल घेतल्यानंतर प्रेक्षकांना बोट दाखवले.
भारत-इंग्लंड दुसरी कसोटी पहिल्या दोन दिवस यशस्वी जैस्वालचे द्विशतक अन् जसप्रीत बुमराहच्या सहा विकेट्समुळे गाजली. पण, १४३ धावांची आघाडी घेऊन मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाला तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या तीन षटकांत ४१ वर्षीय जेम्स अँडरसनने ( James Anderson ) धक्के दिले. कर्णधार रोहित शर्मा अँडरसनच्या अन प्लेअबल चेंडूवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर पुढच्या षटकात अँडरसनने पहिल्या डावातील द्विशतकवीर यशस्वी जैस्वालला स्लीपमध्ये झेल देण्यास भाग पाडले. कालच्या बिनबाद २८ धावांवरून भारताची अवस्था २ बाद ३० अशी झाली होती.
फॉर्माशी झगडणाऱ्या शुबमन गिलला आज नशिबाची साथ मिळताना दिसली. दोन जीवदान मिळाल्यानंतर त्याने खेळपट्टीवर जम बसवला आणि अर्धशतक झळकावले. त्याने तिसऱ्या विकेटसाठी
श्रेयस अय्यरसोबत ११२ चेंडूंत ८१ धावा जोडल्या. टॉम हार्टलीने ही भागीदारी तोडली आणि
बेन स्टोक्सने अप्रतिम झेल घेत अय्यरला २९ धावांवर माघारी जाण्यास भाग पाडले. स्टोक्सच्या या झेलनंतर यष्टीमागे फोक्सने कमाल केली. रेहान अहमदच्या गोलंदाजीवर रजत पाटीदारचा चांगला झेल त्याने टिपला. भारताच्या लंच ब्रेकपर्यंत ४ बाद १३० धावा झाल्या आहेत आणि २७३ धावांची आघाडी मिळवली आहे.
Web Title: India vs England 2nd Test Live Update : A brilliant catch by Ben Stokes does for Shreyas Iyer; Lunch break India lead by 273 runs, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.