Join us

Video : श्रेयस अय्यरचा भन्नाट थ्रो, बेन स्टोक्सची झाली शिकार; पक्की झाली इंग्लंडची हार

भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 13:06 IST

Open in App

India vs England 2nd Test Live Update  ( Marathi News ) :  भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स ( Ben Stokes) भारताच्या मार्गात उभा राहण्याचा प्रयत्न करत होता, परंतु श्रेयस अय्यरने ( Shreyas Iyer) भन्नाट थ्रो करून त्याचा काटा काढला. इंग्लंडने स्टोक्सच्या रुपाने सातवा फलंदाज गमावला. 

झॅक्र क्रॉली आणि बेन डकेट ( २८) यांनी आक्रमक सुरुवात करून दिली. पण, आर अश्विनने ही जोडी तोडली. नाईट वॉचमन रेहान अहमदनेही ( २३) चांगले फटके खेचले, पंरतु अक्षर पटेलच्या चेंडूवर तो पायचीत झाला. त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी रांग लावली. आर अश्विनने ऑली पोप ( २३) व जो रूट ( १६) यांना माघारी पाठवले. कुलदीप यादवने १३२ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ७३ धावा करणाऱ्या क्रॉलीला पायचीत केले. पाठोपाठ जसप्रीत बुमराहने जॉनी बेअरस्टोला ( ९) पायचीत करून इंग्लंडच्या आशा मावळून टाकल्या.

बेन स्टोक्स व बेन फोक्स ही जोडी भारताची डोकेदुखी वाढवेल असे वाटत होती, परंतु भारतीय गोलंदाजांनी धावांवर अंकुश ठेवताना त्यांना दडपणाखाली ठेवले होते. पण, एकदा सेट झाल्यावर स्टोक्स काय कमाल दाखवू शकतो, हे यापूर्वी अनेकदा अनुभवले आहेत. अॅशेस मालिकेत स्टोक्सने ११वा फलंदाज जॅक लिचला सोबतीला घेऊन ऑस्ट्रेलियावर थरारक विजय मिळवला होता. त्यामुळे भारतीय चाहते स्टोक्सच्या विकेट्सची आतुरतेनं वाट पाहत होते. स्टोक्स व फोक्स जोडीने ६० चेंडूंत २६ धावा जोडल्या होत्या आणि ही जोडी सेट झालेली दिसत होती. पण, आर अश्विनच्या गोलंदाजीवर एक धाव घेण्याचा प्रयत्न महागात पडला.फोक्सने मारलेला चेंडू श्रेयसने चपळतेने अडवला आणि अचूक थ्रो करून स्टोक्सला माघारी जाण्यास भाग पाडले. या षटकापूर्वी फोक्सने मारलेला चेंडू स्टोक्सच्या पायावर आदळला होता आणि त्यामुळे तो लंगडत होता. त्याचा परिणाम त्याच्या पळण्यावर जाणवला आणि त्याला ११ धावांवर रन आऊट होऊन माघारी परतला. इंग्लंडला २२० धावांवर सातवा धक्का बसला आणि आता भारताचा विजय पक्का मानला जातोय. इंग्लंडला अजून १७७ धावा करायच्या आहेत. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडश्रेयस अय्यरबेन स्टोक्स