India vs England 2nd Test Live Update ( Marathi News ) : भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी वर्चस्व गाजवले. शुबमन गिलच्या महत्त्वपूर्ण शतकाच्या जोरावर भारताने इंग्लंडसमोर ३९९ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य उभे केले. त्यानंतर आर अश्विनने धक्के देताना पाहुण्यांना बॅकफूटवर ढकलले. भारत मालिकेत १-१ अशी बरोबरी मिळवण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे दिसत आहे आणि चौथा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
२८ वर्षानंतर भारतीय क्रिकेटमध्ये घडला पराक्रम; शुबमन-यशस्वीने गिरवला सचिन-गांगुलीचा कित्ता
भारतीय संघाने ३९६ धावा उभ्या करून इंग्लंडचा पहिला डाव २५३ धावांवर गुंडाळला. पहिल्या डावातील १४३ धावांच्या आघाडीत २५५ धावांची भर घालून भारताने विजयासाठी ३९९ धावांचे लक्ष्य उभे केले. रोहित शर्मा व यशस्वी जैस्वाल पहिल्या सत्रात माघारी परतल्यानंतर शुबमन गिलने डाव सावरला. त्याने श्रेयस अय्यरसह ( २९) ८१ आणि अक्षर पटेलसह ( ४५) ८९ धावांची भागीदारी करून भारताच्या धावसंख्येत मोठी भर घातली. गिल १४७ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह १०४ धावांवर झेलबाद झाला. आर अश्विनने ( २९) धावांचे योगदान दिल्याने भारताला २५५ धावांपर्यंत पोहोचला आले. ४ बाद २११ वरून भारताचा संपूर्ण संघ पुढील ४४ धावांत माघारी परतला. टॉम हार्टलीला ४ विकेट्स मिळाल्या, तर रेहान अहमद व जेम्स अँडरसन यांनी अनुक्रमे ३ व २ विकेट्स घेतल्या.
भारतात आजपर्यंत दोनच संघांना कसोटीच्या चौथ्या डावात २०० हून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करता आला आहे. १९७२ मध्ये दिल्लीत इंग्लंडने ४ बाद २०८ धावा केल्या होत्या आणि १९८७ मध्ये दिल्लीतच वेस्ट इंडिजने ५ बाद २७६ धावा केल्या होत्या. झॅक्र क्रॉली आणि बेन डकेट यांनी इंग्लंडला चांगली सुरुवात करून देताना अर्धशतकी भागीदारी करून दिली, परंतु आर अश्विनने त्यांना झटका दिला. बेन डकेट २८ धावांवर झेलबाद झाला आणि केएस भरतने अप्रतिम झेल टिपला. भरतचा झेल पाहून रोहित शर्मा खूपच आनंदी झाला. इंग्लंडने तिसऱ्या दिवसअखेर १ बाद ६७ धावा केल्या असून त्यांना विजयासाठी आणखी ३३२ धावा करायच्या आहेत.