India vs England 2nd Test Live Update : फॉर्माशी झगडणाऱ्या शुबमन गिलने ( Shubman Gill Century) दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी शतक झळकावले. सातत्याने अपयशी ठरणाऱ्या गिलचे कसोटी संघाती स्थान धोक्यात आले होते, परंतु आज इंग्लंडविरुद्ध त्याने शतकी खेळी करून टीकाकारांना उत्तर दिले. २०१७नंतर भारतीय खेळपट्टीवर तिसऱ्या क्रमांकावर शतक झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरला.
भारत-इंग्लंड दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचे पहिले सत्र इंग्लंडच्या नावावर राहिले. पण, त्यानंतर भारताने वर्चस्व गाजवले. १४३ धावांची आघाडी घेऊन मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाला तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या तीन षटकांत ४१ वर्षीय जेम्स अँडरसनने धक्के दिले. कर्णधार रोहित शर्मा (१३) आणि यशस्वी जैस्वाल ( १७) यांना त्याने माघारी पाठवले. त्यानंतर अँडरसनला थांबवण्याचा बेन स्टोक्सने घेतलेला निर्णय भारताच्या पथ्यावर पडला. श्रेयस अय्यर ( २९) व शुबमन गिल यांनी सेट होताना ११२ चेंडूंत ८१ धावा जोडल्या. टॉम हार्टलीने ही भागीदारी तोडली आणि बेन स्टोक्सने अप्रतिम झेल घेत अय्यरला माघारी जाण्यास भाग पाडले. बेन फोक्सने यष्टींमागे रजत पाटीदारचा चांगला झेल त्याने टिपला.
गिल खेळपट्टीवर उभा राहिला आणि त्याला अक्षर पटेलची साथ मिळाली. दोघांनी इंग्लंडच्या फिरकी माऱ्याचा सहजतेने सामना केला. या दोघांनी भारताच्या धावांची गती कायम राखताना इंग्लंडवर दडपण निर्माण केले. गिलने रेहान अहमदला ६,४,४ असे फटके मारून शतकाच्या दिशेने वाटचाल केली. त्याने १३२ चेंडूंत ११ चौकार व २ चौकाराच्या मदतीने कसोटीतील तिसरे व तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना पहिले शतक झळकावले. २४व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० किंवा त्यापेक्षा जास्त शतक झळकावणाऱ्या भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर व विराट कोहली यांच्याशी आज गिलने बरोबरी केली. सचिनने ३० आणि विराटने २१ शतकं झळकावली होती, तर गिलचे हे १०वे आंतरराष्ट्रीय शतक ठऱले.