Join us  

शुबमन गिलच्या शतकाने भारताला दिला आधार; इंग्लंडच्या डोक्यावरील वाढवला भार, ठेवले तगडे लक्ष्य 

शुबमन गिलला ( Shubman Gill) मोक्याच्या क्षणी सूर गवसला आणि त्याने शतकी खेळी करून भारताची आघाडी आणखी मजबूत केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2024 3:35 PM

Open in App

India vs England 2nd Test Live Update : भारतीय संघाने पहिल्या डावात ३९६ धावा उभ्या केल्यानंतर इंग्लंडचा पहिला डाव २५३ धावांवर गुंडाळून पहिल्या डावात १४३ धावांची आघाडी घेतली. पण, दुसऱ्या डावात भारताची सुरुवात काही खास झाली नाही. मात्र, शुबमन गिलला ( Shubman Gill) मोक्याच्या क्षणी सूर गवसला आणि त्याने शतकी खेळी करून भारताची आघाडी आणखी मजबूत केली. गिलनंतर अक्षर पटेलने ( ४५) दुसऱ्या डावात भारतासाठी सर्वोत्तम धावा केल्या. आर अश्विननेही अखेरच्या टप्प्यात चांगली फटकेबाजी केली. 

भारतीय संघाला तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात दोन धक्के बसले. जेम्स अँडरसनने  कर्णधार रोहित शर्मा (१३) आणि  यशस्वी जैस्वाल ( १७) यांना बाद केले. श्रेयस अय्यर ( २९) व शुबमन गिल यांनी सेट होताना ११२ चेंडूंत ८१ धावा जोडल्या. टॉम हार्टलीने  अय्यरला माघारी जाण्यास भाग पाडले. पदार्पणवीर रजत पाटीदार ( ९) दुसऱ्या डावातही अपयशी ठरला. पण, गिल खेळपट्टीवर उभा राहिला आणि त्याला अक्षर पटेलची साथ मिळाली. या दोघांनी ८९ धावांची भागीदारी केली.  शोएब बशीरने भारताला मोठा धक्का देताना गिलची विकेट मिळवली. गिल १४७ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह १०४ धावांवर झेलबाद झाला. अक्षर पटेलही ४५ धावांवर हार्टलीच्या गोलंदाजीवर पायचीत झाला.  

यानंतर स्थानिक खेळाडू केएस भरत यालाही अपयश आले. टी ब्रेकनंतर आक्रमक फटका मारण्याच्या प्रयत्नात तो ६ धावांवर रेहान अहमदला विकेट देऊन बसला. कुलदीप यादवही ( ०) मोठआ फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. आर अश्विन आणि जसप्रीत बुमराह ( ० धावा, २६ चेंडू ) यांनी नवव्या विकेटसाठी महत्वपूर्ण २६ धावा जोडल्या. अश्विन २९ धावांवर बाद झाला आणि भारताचा दुसरा डाव २५५ धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडसमोर विजयासाठी ३९९ धावांचे लक्ष्य ठेवले गेले.

भारतात आजपर्यंत दोनच संघांना कसोटीच्या चौथ्या डावात २०० हून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करता आला आहे. १९७२ मध्ये दिल्लीत इंग्लंडने ४ बाद २०८ धावा केल्या होत्या आणि १९८७ मध्ये दिल्लीतच वेस्ट इंडिजने ५ बाद २७६ धावा केल्या होत्या.  

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडशुभमन गिलआर अश्विनअक्षर पटेल