India vs England 2nd Test Live Update : भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या डावात निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. भारताच्या ३९६ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने सुरुवात तर चांगली केली होती, परंतु अक्षर पटेलने फलंदाज झॅक क्रॉलीची विकेट घेऊन भारतासाठी पुनरागमाचे दार उघडले. त्यानंतर जसप्रीत बुमराह व कुलदीप यादवने इंग्लंडला शरणागती पत्करण्यास भाग पाडले. जसप्रीतने दोन भन्नाट चेंडूंवर इंग्लंडच्या ऑली पोप व बेन स्टोक्स यांचे त्रिफळे उडवले. पण, इंग्लंडने ६ बाद १७२ धावांवरून चांगला खेळ केला आणि पिछाडी खूपच कमी केली.
जसप्रीत बुमराहने 'दांडा' उडवला, हतबल बेन स्टोक्स बॅट फेकून उभा राहिला; विक्रम नोंदवला
भारतीय संघाने पहिल्या डावात ३९६ धावा उभ्या केल्या आणि यापैकी २०९ धावा या एकट्या यशस्वी जैस्वालच्या होत्या. अन्य फलंदाजांना मिळून फक्त १८५ धावाच करता आल्या. यशस्वीने २९० चेंडूंत १९ चौकार व ७ षटकारांच्या मदतीने २०९ धावांची खेळी साकारली. इंग्लंडचे सलामवीर झॅक क्रॉली व बेन डकेट यांनी ५९ धावांची सलामी दिली. कुलदीपने डकेटला ( २१ ) माघारी पाठवले. क्रॉलीने ७८ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह ७६ धावा कुटल्या. अक्षर पटेलने ही विकेट मिळवली आणि त्यानंतर जसप्रीत व कुलदीपने कमाल केली. जसप्रीतने जो रूट ( ५), ऑली पोप ( २३) व जॉनी बेअरस्टो ( २५) यांना माघारी पाठवले. कुलदीपने बेन फोक्स ( ६) व रेहान अहमद ( ६) विकेट मिळवून कोंडी केली.