India vs England 2nd Test Live Update : इंग्लंडने दमदार सुरुवात केली खरी, परंतु भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त पुनरागमन केले. अक्षर पटेलने इंग्लंडचा स्टार फलंदाज झॅक क्रॉलीची विकेट घेऊन भारताला पुनरागमनाचा रस्ता खुला करून दिला. त्यानंतर जसप्रीत बुमराह त्यांच्यावर कोपला. त्याने दोन विकेट्स घेत डाव पलटवला.
भारतीय संघाने पहिल्या डावात ३९६ धावा उभ्या केल्या आणि यापैकी २०९ धावा या एकट्या यशस्वी जैस्वालच्या होत्या. अन्य फलंदाजांना मिळून फक्त १८५ धावाच करता आल्या. यशस्वीने २९० चेंडूंत १९ चौकार व ७ षटकारांच्या मदतीने २०९ धावांची खेळी साकारली. त्यानंतर भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत शुबमन गिल ( ३४ ) व रजत पाटीदार ( ३२) यांचा क्रमांक येतो. इंग्लंडचे सलामवीर झॅक क्रॉली व बेन डकेट यांनी दमदार सुरुवात करून देताना ९ षटकांत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. कुलदीप यादवने इंग्लंडला ५९ धावांवर पहिला धक्का दिला आणि बेन डकेट ( २१ ) माघारी परतला.
क्रॉलीने दुसऱ्या बाजूने जोरदार फटकेबाजी केली. पण, अक्षर पटेलने त्याची विकेट मिळवून दिली. क्रॉली ७८ चेंडूंत ११ चौकार व २ षटकारांसह ७६ धावांवर झेलबाद झाला. श्रेयस अय्यरने अफलातून झेल घेतला आणि तो पाहून वन डे वर्ल्ड कप फायनलमधील ट्रॅव्हीस हेडने भारतीय कर्णधार रोहित शर्माचा घेतलेला झेल आठवला. त्यानंतर जसप्रीत बुमराहने इंग्लंडचा यशस्वी फलंदाज जो रूट ( ५) याचा अडथळा दूर केला. बुमराहने त्याच्या पुढच्या षटकात ऑली पोप ( २३) माघारी पाठवून इंग्लंडला चौथा धक्का दिला.