लॉर्ड्स - भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुस-या कसोटीचे पारडे यजमानांच्या बाजूने झुकलेले आहे. जॉनी बेअरस्टो आणि ख्रिस वोक्स यांनी धमाकेदार भागीदारी करताना इंग्लंडला मजबूत आघाडी मिळवून दिली. वोक्सने कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावताना भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. इंग्लंडने तिस-या दिवसअखेर 250 धावांची आघाडी घेतली आहे.
(ख्रिस व्होक्सचे शतक, इंग्लंडची कसोटीवर मजबूत पकड)
इंग्लंडने दुस-या दिवशी भारताचा डाव 107 धावांत गुंडाळला. प्रत्युत्तरात इंग्लंडकडून तिस-या दिवसअखेर 6 बाद 357 धावा केल्या. वोक्सने 159 चेंडूंत 18 चौकार लगावत नाबाद 120 धावा केल्या आहेत. त्याच्यासोबत सॅम कुरन 22 धावांवर खेळपट्टीवर आहे. वोक्स व्यतिरिक्त बेअरस्टोने 144 चेंडूंत 12 चौकारांसह 93 धावांची खेळी केली. वोक्स आणि बेअरस्टो यांनी सहाव्या विकेटसाठी 189 धावांची भागीदारी केली. शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या बेअरस्टोव्हला हार्दिर पांड्याने बाद केले. यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने हवेत झेप घेत बेअरस्टोचा झेल टीपला. या कॅचची सोशल मीडियावर प्रशंसा झाली.
दिवसाच्या पहिल्या सत्रात आर. आश्विनला गोलंदाजी न देण्याचा कर्णधार कोहलीचा निर्णय आश्चर्यकारक ठरला. भारताचा सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरलेल्या मोहम्मद शमी याने १६ षटकांत ६७ धावांच्या मोबदल्यात तीन गडी बाद केले. तर हार्दिक पांड्याने ६६ धावात दोन गडी बाद केले. इशांत शर्मा यानेही एक बळी मिळवला. लॉर्ड्सवर संधी देण्यात आलेल्या कुलदीपला अजून एकही बळी मिळालेला नाही.