Join us  

India vs England 2nd Test: ' या ' पाच गोष्टी केल्या तर लॉर्ड्स कसोटीवर भारताचा झेंडा

या सामन्यात पुजाराला संधी मिळायला हवी. पुजाराला संघात घेण्यासाठी सलामीवीर शिखर धवन किंवा लोकेश राहुल यांच्यापैकी कुणाला वगळायचे, हा कठोर निर्णय संघ व्यवस्थापनाला घ्यावा लागेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2018 6:23 PM

Open in App
ठळक मुद्देहा सामना जर भारतीय संघाला जिंकायचा असेल तर त्यांनी  ' या ' पाच गोष्टी करायला हव्यात.

मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. हा पराभव जिव्हारी लागणारा होता, कारण भारताला फक्त 31 धावा कमी पडल्या होत्या. पण आता दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. हा सामना जर भारतीय संघाला जिंकायचा असेल तर त्यांनी  ' या ' पाच गोष्टी करायला हव्यात.

1. स्लीपमधल्या झेलचा सराव : भारताने पहिल्या सामन्यात स्लीपमध्ये काही झेल सोडल्या. हे झेल भारतीय संघाला महाग पडले होते. त्यामुळे दुसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघाने स्लीपमध्ये झेल पकडण्याचा सराव करायला हवा.

2. चेतेश्वर पुजाराला संधी : पहिल्या कसोटी सामन्यात जेव्हा चेतेश्वर पुजाराला वगळण्यात आले, तेव्हा बऱ्याच जणांनी भुवया उंचावल्या होत्या. या गोष्टीचे विपरीत परीणामही भारताला पाहायला मिळाले. त्यामुळे या सामन्यात पुजाराला संधी मिळायला हवी. पुजाराला संघात घेण्यासाठी सलामीवीर शिखर धवन किंवा लोकेश राहुल यांच्यापैकी कुणाला वगळायचे, हा कठोर निर्णय संघ व्यवस्थापनाला घ्यावा लागेल.

3. इंग्लंडची शेपूट लवकर गुंडाळणे : पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजीच्या शेपटाने भारताला त्रस्त केले होते. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना इंग्लंडची 7 बाद 87 अशी अवस्था होती. पण सॅम कुरनसह तळाच्या फलंदाजांनी 90 धावा जोडल्या आणि त्यामुळेच भारताला पराभव पत्करावा लागला.

4. फलंदाजीत सुधारणा करणे : पहिल्या कसोटीत भारताचा कर्णधार विराट कोहलीचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांना चांगली फलंदाजी करता आली नव्हती. त्यामुळे या सामन्यात अन्य फलंदाजांनी आपल्या जबाबदारीनुसार खेळ करायला हवा. दोन फलंदाजांनी जर चांगली भागीदारी रचली तर तो भारताच्या विजयाचा पाया ठरू शकतो.

5. कोहलीला मुक्तपणे खेळायला द्यावे : कोहली सध्या चांगल्या फॉर्मात आहे. त्यामुळे त्याला मुक्तपणे फलंदाजी करण्याची मुभा द्यायला हवी. भारतीय संघातील फलंदाजांनी लौकिकाला साजेशी फलंदाजी केली तर कोहलीला मुक्तपणे फलंदाजी करता येईल आणि भारतीय संघ धावांचा डोंगर उभारू शकेल.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहलीचेतेश्वर पुजारा