लंडन : इंग्लंजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या कसोटी सामन्यासाठी झालेली संघनिवड चुकीची होती, अशी टीका करण्यात आली होती. यावेळी भारताचा सलामीवीर शिखर धवन आणि यष्टीरक्षक दिनेश कार्तिक हे टीकेचे धनी ठरले होते. त्यामुळे लॉर्ड्स कसोटीसाठी धवन आणि कार्तिक यांना वगळण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.
धवनला परदेशातील कसोटी सामन्यांमध्ये फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. इंग्लंडमधील सराव सामन्यातील दोन्ही डावांत धवनला भोपळाही फोडता आला नव्हता. त्यामुळे त्याला पहिल्या कसोटीत संघखात स्थान मिळणार नाही, असे म्हटले जात होते. पण संघ व्यवस्थापनाने त्याला संधी दिली, पण धवनला या संधीचे सोने करता आले नाही. त्यामुळे संघात चेतेश्वर पुजाराला स्थान देण्याचा विचार झाल्यास धवनला संघातून बाहेर काढण्यात येऊ शकते.
कार्तिककडे अनुभव चांगला असला तरी पहिल्या कसोटीत त्याच्याकडून बऱ्याच चुका झाल्या. यष्टीरक्षण करताना त्याच्याकडून काही झेल सुटले. त्याचबरोबर फलंदाजीमध्येही त्याला फारशी चमक दाखवता आली नाही. पहिल्या कसोटीतील दोन्ही डावांमध्ये कर्णधार कोहली समोर फलंदाजीला असतानादेखील कार्तिकला जास्त धावा करता आल्या नाहीत. त्याच्या जागी युवा यष्टीरक्षक रिषभ पंतला संघात स्थान देता येऊ शकते. पण जर धवनला संघात कायम ठेवायचे असेल तर कार्तितला वगळून लोकेश राहुलकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.