भारतीय क्रिकेट संघानं लॉर्ड्सवर इंग्लिश संघाला धूळ चारली. शमी-बुमराहच्या जबरदस्त भागिदारीच्या जोरावर भारतानं सामन्यात कमबॅक केलं. त्यानंतर भारताच्या वेगवान गोलंदाजीसमोर इंग्लंडच्या संघानं नांगी टाकली. इंग्लंडला १२० धावांत गुंडाळत भारतानं १५१ धावांनी विजय मिळवला. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असतो याची प्रचिती शेवटच्या दिवशी वारंवार आली.
पाचव्या दिवसाचा खेळ सुरू झाला त्यावेळी भारतीय संघ ६ बाद १८१ असा अडचणीत होता. ऋषभ पंतकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र तो लवकर बाद झाला. मात्र भारताच्या शेपटानं इंग्लंडला तडाखा दिला. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहनं नवव्या विकेटसाठी ८९ धावांची अभेद्य भागिदारी रचली. शमी आणि बुमराहनं इंग्लिश गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. भारतीय शेपटाचा तडाखा इंग्लंडसाठी अनपेक्षित होता. भारतीय संघाच्या या प्रतिहल्ल्यानं इंग्लंड बॅकफूटवर गेला.
फलंदाजीत इंग्लंडला घाम फोडणाऱ्या शमी आणि बुमराहनं गोलंदाजीतही कमाल केली. त्यांना नवख्या मोहम्मद सिराज आणि अनुभवी इशांत शर्मानं उत्तम साथ दिली. त्यामुळे एकावेळी सामना जिंकण्याच्या स्थितीत असलेला इंग्लंडचा संघ सामना वाचवण्यासाठी संघर्ष करू लागला. त्याचवेळी कर्णधार विराट कोहलीनं इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ओली रॉबिन्सनला रडारवर घेतलं.
सॅम करन भोपळा न फोडताच माघारी परतल्यावर रॉबिन्सन मैदानात आला. त्यावेळी स्लिपमध्ये असलेल्या विराटनं त्याचं यथोचित स्वागत केलं. 'मला कव्हर ड्राईव्ह लगावता आला नाही, तेव्हा हा (रॉबिन्सन) माझ्यावर हसत होता आणि आता तो त्याच्या घरात कसोटी वाचवण्यासाठी खेळतोय. ही इनिंग सामन्यात किती महत्त्वाची ठरणार आहे?', अशा शब्दांत विराटनं रॉबिन्सनला डिवचलं.